मल्टिवर्स – टाइम ट्राव्हल

>> डॉक्टर स्ट्रेंज

फ्रें च आणि बेल्जियम यांची संयुक्त निर्मिती असलेल्या `Incredible but True’ या चित्रपटाला ब्लॅक कॉमेडीची जोड देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा एका वेगळ्याच धाटणीचा साय-फाय चित्रपट बनला आहे. `Incredible but True’ (French: Incroyable mais vrai) हा 2022 साली आलेला एक अफलातून साय-फाय चित्रपट. ‘टाइम ट्रव्हल’ या विषयावर अनेक उत्तमोत्तम चित्रपट होऊन गेले आहेत. त्यातीलच हा एक उत्तम चित्रपट. अॅलेन आणि मारी हे जोडपे उपनगरात एक घर शोधत आहेत. त्यांचा इस्टेट एजंट त्यांना एक घर दाखवायला घेऊन आलेला आहे. मात्र या जोडप्याला ते घर जरा मोठे वाटते; त्यांना लहान घराची आवश्यकता असते आणि त्यामुळे ते दुसरे एखादे लहान घर दाखवण्याची विनंती त्या एजंटला करतात. त्यावर एजंट त्यांना या घरात एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे, असे सांगतो आणि त्यांना त्या घराच्या तळघरात घेऊन जातो.

तळघरात एक मोठे भुयार असते. एजंटच्या विनंतीला मान देऊन दोघेही तळघरात उतरतात. मारी सगळ्यात शेवटी खाली उतरत असते. ती उतरत असताना एजंट तिला भुयाराचा दरवाजा बंद करायची विनंती करतो. काहीशा उत्सुकतेने हे जोडपे पुढे सरकते. ते जेव्हा भुयारातून बाहेर पडतात तेव्हा अॅलेन आणि मारीला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. कारण ते तळघरातून भुयारात उतरलेले असतात आणि जेव्हा भुयाराच्या बाहेर पडतात, तेव्हा ते त्या घराच्या पहिल्या मजल्यावर असतात. अॅलेनला अजून एक धक्का बसतो. जेव्हा तो घराबाहेर बघतो तेव्हा सकाळ झालेली असते. मात्र ते घर बघायला आलेले असतात ती संध्याकाळची वेळ असते.

दोघे जरा सावरल्यावर एजंट त्यांना सांगतो की, या घरातील भुयार म्हणजे खरे तर एक टाइम ट्रव्हल पोर्टल आहे. या भुयारातून आपण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आपण काळाच्या 12 तास पुढे आलेलो आहोत. त्यामुळे आता सकाळ दिसत आहे. घराचे रहस्य सांगून झाल्यावर तो त्यांना घरासंदर्भात लवकर निर्णय घेण्याची विनंती करतो. कारण इतर बरेच जण हे घर घेण्यास इच्छुक आहेत, असे तो सांगतो. उद्यापर्यंत विचार करून निर्णय घेतो, असे दोघेही त्या एजंटला सांगतात.

दोघेही आता ते घर खरेदी करतात आणि त्याला सजवायलादेखील सुरुवात करतो. इथेच घराच्या दारावर एक मांजर अॅलेनला सापडते आणि त्याला तिचा लगेच लळा लागतो. रात्री मारी पुन्हा एकदा भुयारातून प्रवास करते. ती बाहेर पडते तेव्हा दिवस बराच वर गेलेला असतो आणि अॅलेन बागेमध्ये त्याचा बॉस आणि बॉसच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेला तिला दिसतो. नवीन घर घेतल्याच्या निमित्ताने अॅलेनने आपला बॉस आणि बॉसच्या मैत्रिणीला घरी आमंत्रण दिलेले असते. मी वॉशरूममध्ये असल्याने तुम्ही आलात तेव्हा मी उपस्थित नव्हते, असे सांगत मारी त्यांची माफी मागते आणि वेळ मारून नेते.

अॅलेनच्या बॉसने नुकतेच इलेक्ट्रिक ट्रान्सप्लाण्ट करून घेतलेले असते आणि हे गुपित तो जेवणाच्या टेबलावर उघड करतो. अॅलेनदेखील आपल्या घराचे गुपित उघड करणारच असतो की, मारी त्याला अडवते आणि विषय बदलते. मारीच्या मनात नक्की काय चालले आहे याचा आपल्याला अंदाज तेव्हा लागतो, जेव्हा या भुयाराचे एक अजून रहस्य उघड होते. या भुयारातून प्रवास करणारा माणूस काळाच्या 12 तास पुढे जात असतो आणि जोडीला त्याचे वय तीन दिवसांनी कमी होत असते. याच गोष्टीचा उपयोग करून मारीला सतत त्या भुयारातून प्रवास करायचा असतो, ज्यामुळे ती लवकरात लवकर पुन्हा तरुण बनेल आणि आपले मॉडेलिंगचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करू शकेल. मारीने आता टनेलच्या शेवटाला एक आरसादेखील लावून ठेवलेला आहे. आपण किती प्रमाणात तरुण होत आहोत हे तिला तपासायचे असते. अॅलेनला मात्र हे सगळे विचित्र वाटत असते. तो ते भुयार कायमचे बंद करण्याच्या प्रयत्नात असतो.

मारी पुन्हा तरुण होते का? याची तिला काय किंमत चुकवावी लागते? की ती यशस्वी होण्याच्या आधी अॅलेन भुयार बंद करण्यात यशस्वी होतो? या सगळ्याची उत्तरे स्वतः मिळवण्यात जास्त मौज आहे. तेव्हा फावल्या वेळात या चित्रपटाचा आनंद घेण्यास चुकू नका.