नववर्षाचा शुभारंभ हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया मालिकेने होणार, संघाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर हिंदुस्थानचा संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अॅरॉन फिंचकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात असणारा मार्नस लाबुशेन यालाही वन डे संघात स्थान देण्यात आले आहे.

25 वर्षीय लाबुशेन टीम इंडियाची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून लाबुशेन याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये लाबुशेन याने 12 कसोटी लढतीत 58.05 च्या दमदार सरासरीने 1103 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन कसोटीमध्ये त्याने सलग तीन शतकं (पाकिस्तानविरुद्ध 185 आणि 162, न्यूझीलंडविरुद्ध 143) झळकावली आहेत. त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी टीम इंडियाच्या गोलंदाजांना विशेष रणनिती आखावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने सीन अबॉट यालाही संघात स्थान दिले आहे. पाच वर्षानंतर तो पुनरागमन करत आहे. यासह वेगवान गोलंदजा जोस हेझजवूड आणि फिरकीपटू एश्टन एल्गर यानेही संघात पुनरागमन केले आहे. परंतु अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श आणि नाथन लियॉन यांना मात्र वगळण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ –
अॅरोन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एल्गर, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन. स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, एश्टन टर्नर, डेविड वॉर्नर, एडम झंपा

तीन सामन्यांची मालिका –
पहिला सामना – 14 जानेवारी (मुंबई)
दुसरा सामना – 17 जानेवारी (राजकोट)
तिसरा सामना – 19 जानेवारी (बंगळुरू)