
द्वारकानाथ संझगिरी
मेलबर्न कसोटीच्या विजयानंतर मी लिहिलं होते- ‘साखरपुडा झाला, आता लग्न लवकर आटपा.’ चला, लग्नही निर्विघ्नपणे आटोपलं. पावसाने वरातीत व्यत्यय आणला. पण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं, हे कट्टर ब्रह्मचाऱयाला बोहल्यावर चढवण्यासारखं होतं. 3-1च्या ऐवजी विजय 2-1 असा मिळाला. पण विजय हा विजय असतो.
मला एक मान्य आहे की, हा ऑस्ट्रेलियन संघ, त्यांच्या इतिहासातील सर्वात कमकुवत संघ आहे. पॅकर सर्कसच्या काळातला बॉबी सिंपसनचा संघही एवढा दुबळा नव्हता. चार कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज शतक ठोकू शकला नाही. ही आकडेवारीच त्यांच्या फलंदाजीतल्या दुबळेपणाची व्याख्या आहे. ऑस्ट्रेलियासाठी स्मिथ आणि वॉर्नर हे विजयनगरचे साम्राज्य स्थापणाऱया हरिहर आणि बुक्राप्रमाणे होते. पण ते संघात नव्हते. मग फलंदाजीत साम्राज्य कोण स्थापणार? पण त्यात आपली काय चूक? चेंडू कुरतडण्याचं पाप त्यांना आपण थोडंच करायला सांगितलं होतं. त्यांच्यावर कारवाई हिंदुस्थानी क्रिकेट मंडळाने थोडीच केली होती? आपल्यासमोर जो ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट संघ आला त्याला आपण धूळ चारली. ‘या विजयाचं महत्त्व काय?’ असं मी मला स्वतःला विचारतो, तेव्हा अनेक उत्तरं मला मिळतात.
त्यातली काही उत्तरं अशी –
अनेक वर्षांनंतर हिंदुस्थानी उपखंडाबाहेर, एका उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणासमोर हिंदुस्थानी फलंदाजांनी ताठ मानेने फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत असेल; पण गोलंदाजी जवळपास जागतिक दर्जाची होती. खेळपट्टय़ा त्यांच्या होत्या. त्या बनवणारे क्युरेटर्स त्यांचे होते. पाच महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये आपल्या सरासरी 300 धावा झाल्या असल्या तरी आपण मालिका जिंकलो असतो. पण तेवढय़ाही आपल्याला जमत नव्हत्या. तिथे विराट कोहली हा एकटाच फलंदाजीचा उंच माड होता. इतर झुडपं होती. ऑस्ट्रेलियात धावांच्या बाबतीत विराट कोहलीपेक्षा एक उंच माड पुजाराने उभा केला. पुजारा हा हिंदुस्थानी संघाच्या धावांचं ओझं उचलणारा ग्रीक देव ऍटलास वाटला. त्याने रात्री झोपताना पॅड्स काढले नसते तरी चाललं असतं. दुसऱया दिवशी घालायचेच होते. पॅड्स न घातलेला पुजारा दिसणं दुर्मिळ झालं होतं. असं म्हणतात की, एकदा रात्री झोपेतही रन वन रन टू ओरडत होता. या वेळी खेळपट्टीवर जाऊन त्याने फक्त डुलकी काढली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची झोप उडवली. स्वतःचा स्ट्राईक रेट त्याने वाढवला. फटक्यांची समृद्धी दाखवली. मुख्य म्हणजे भागिदाऱया केल्या. कसोटीत धावा उभारण्यासाठी भागिदाऱया अत्यंत महत्त्वाच्या असतात. ‘भटाला दिली ओसरी’ ही म्हण जाऊन पुजाराला दिली ओसरी पुजारा हातपाय पसरी ही नवी म्हण वापरात येऊ शकते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडे विराट कोहलीसाठी ‘प्लॅन’ आहे असं वाटायचे. पुजारासाठी त्यांनी प्लॅनच केला नव्हता. त्यांनी प्लॅन करेपर्यंत पुजारा त्यांना लुटून गेला. सोमनाथ लुटणारा गझनीचा महंमद आम्हाला कटकटी का वाटतो. हे पुजाराच्या लुटीनंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना कळलं असेल. पुजाराला अगरवाल, रहाणे, पंत आणि कोहलीने (हो कोहलीने!) ‘साथ’ दिली असं म्हणावे लागतंय.
मयांक अगरवालच्या रूपाने आपल्याला अचानक एक आघाडीचा फलंदाज सापडला. त्याची सुरुवातच विस्तवाशी खेळून झाल्याने पुढचे पेपर्स त्याला सोपे वाटतील. त्याने मुरली विजयच्या शाल-श्रीफळाची बहुदा सोय केली असावी आणि पृथ्वी शॉ परतल्यावर राहुलही दीर्घ रजेवर जाईल. त्याच्यामुळे मेलबर्न आणि सिडनी कसोटीत नवा चेंडू मधल्या फळीत घुसला नाही. त्यामुळे हाहाकार माजला नाही. त्याचे आणि पुजाराचे मधल्या फळीने आभार मानावेत. त्यामुळे आगीच्या ज्वाला त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत.
हिंदुस्थानी गोलंदाजांनी विशेषतः वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा आनंद दिला. धावांचं पाठबळ मिळाल्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाला गुंडाळणं सोपं गेलं. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची पळापळ होतेय. कोई यहां भागा, कोई वहां! किंवा कुणी हेल्मटवर चेंडू खातोय, कुणी खांद्यावर, कुणी कुशीत हे दृश्य गुदगुल्या करणारं होतं. एकेकाळी हिंदुस्थानी संघाला हसणारे दात घशात गेलेले पाहताना बरं वाटलं. मला एकदा कै. रमाकांत देसाईने सांगितलेला एक किस्सा आठवतोय. 1962च्या वेस्ट इंडिजच्या दौऱयावर कर्णधार नरी कॉन्ट्रक्टरने रमाकांतला सांगितलं होतं, ‘‘त्यांच्यावर बॉऊन्सर्स टाकू नकोस. नाहीतर आपल्यावर किती येतील विचार कर.’’ रमाकांतचा बॉऊन्सर हा गांधील माशीसारखा कानात गुणगुणला जायचा. रमाकांतच्या निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी मी आणि रमाकांत एका लग्नाच्या रिसेप्शनला बसलो होतो. एक मर्सिडीज थांबली. त्यातून एक सुटातला माणूस उतरला. त्याने रमाकांतला पाहिलं आणि अक्षरशः त्या सुटात त्याने रमाकांतला साष्टांग नमस्कार घातला आणि पाकिस्तानच्या हनिफ महंमदला एक शिवी घालून म्हणाला, ‘‘ऑऑऑऑ को क्या भगाया था आपने.’’ माझं अंग शहारलं होतं. त्या वेळी असे शहारण्याचे प्रसंग क्वचित येत. आता शहारायलाच होत नाही. कारण परदेशी फलंदाजांना ‘पळवणं’ हे रोजचं झालंय. त्यामुळे कर्णधारालाही ‘बाउैन्सर टाकू नको रे बाबा’ असं गोलंदाजाला सांगावं लागत नाही. उलट एकेकाळी विंडीचा क्लाइव्ह लॉईड स्लिपमध्ये उभं राहून ‘लेट गो’ ओरडायचा आणि वेगवान चेंडू कानाजवळून जायचे. तसं करण्याची ताकद आता विराट कोहलीकडे आहे. बुमरा सातत्याने ताशी 145 किलोमीटर्सने चेंडू टाकू शकतो. त्याला ऑस्ट्रेलियन्स जगातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणायला लागले. आणि काय हवंय? कारणाशिवाय ऑस्ट्रेलियन्स स्वतःच्या बापाचंही कौतुक करत नाहीत.
अगरवाल आणि पंत हे दोन खेळाडू या मालिकेने दिले असं या क्षणी वाटतंय. क्रिकेटमध्ये असे क्षण, पुढे क्षणाक्षणाला बदलू शकतात. पण त्यांनी आशा दाखवलीय. रिषभ पंत इंग्लंडमध्ये फलंदाज म्हणून गोंधळला होता. मधेच टी-20सारखा फलंदाजी करायचा. मधेच पुजारा आडनाव असल्याप्रमाणे खेळायचा. इथे त्याला कसोटीत काय करायला हवं ते उमगलं. इंग्लंडमध्ये स्विंगसमोर त्याचं यष्टीरक्षणही गोंधळलं होतं. इथे त्याला त्याचाही सूर सापडला. फक्त त्याने ‘तो पुढचा ऍडॅम गिलख्रिस्ट आहे’ वगैरे कौतुक गंभीरपणे घेऊ नये. दुसरा ब्रॅडमन, दुसरा तेंडुलकर, दुसरा सॉबर्स ही अंधश्रद्धा असते. देवाने त्यांचे साचे तोडलेले असतात. तसाच देवाने गिलख्रिस्टचा साचाही तोडून टाकलाय. दुसऱया कुणाला तरी उद्या दुसरा रिषभ पंत म्हटलं जाईल. एवढी महत्त्वाकांक्षा ठेवावी.
ऑस्ट्रेलियाला आपण आणखीन एका गोष्टीत हरवलं. आक्रमकतेत आणि स्लेजिंगच्या नाटय़छटेतसुद्धा. फक्त नाटय़छटेचं शीर्षक बदललं. ‘राव मेले पंत चढले’ झालं.
अजित वाडेकरच्या संघाने जेव्हा वेस्ट इंंडिजला वेस्ट इंडिजमध्ये आणि इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवलं तेव्हाचा आनंद म्हणजे चंद्र तोडून घरी कंदील म्हणून लावल्यासारखा होता. निव्वळ स्वप्न! इथे ऑस्ट्रेलियात आपण जिंकू शकतो. ही भावना प्रबळ होती. पण भावना असणं आणि घडणं हा प्रवास काटय़ाकुटय़ाचा असतो. पर्थला टोचलेले काटे आपण शिताफीने काढून फेकले आणि जिंकलो. इतिहासाची नवी सोनेरी पाने लिहिली. त्याचा आनंद अवर्णनीय आहेच.




























































