IND vs BAN रोहित फिट, दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यादरम्यान अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्माला मायदेशी परतावे लागले हेते. मात्र रोहित आता फिट झाला आहे. रोहित येत्या दोन दिवसांत पुन्हा बांगलादेशला रवाना होणार असून दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे.

सध्या हिंदुस्थानी संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर असून तीन एकदिवसाय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानला 2-1 असा पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या इराद्याने हिंदुस्थानी संघ मैदानात उतरला आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना एक झेल टिपत असताना रोहितच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिसऱ्या वनडे आणि पहिल्या कसोटीचे नेतृत्व के.एल. राहुलकडे सोपवण्यात आले होते. दुसऱ्या कसोटीत रोहित खेळतो की नाही, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र एका क्रीडा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार रोहित येत्या दोन दिवसांत पुन्हा बांगलादेशला रवाना होणार असून दुसऱ्या कसोटीत तो मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर रोहित सलामीला न फलंदाजी करता नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. हा सामना हिंदुस्थानने अवघ्या 5 धावांनी गमावला होता.

दुखापत असतानाही तुफान फटकेबाजी

दुखापत झालेली असल्याने सलामीला न उतरता नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या रोहितने तुफान फटकेबाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेऊन ठेवला होता. मात्र, त्याच्या या प्रयत्नांना यश आले नाही. या सामन्यात रोहितने 28 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने तुफानी 51 धावांची नाबाद खेळी केली होती.