
हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून ढाका येथे होणार आहे. या लढतीसाठी बीसीसीआयने मंगळवारी हिंदुस्थानी संघाची घोषणा केली. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या हिंदुस्थानचे लक्ष्य आता व्हाईट वॉशकडे आहे. मात्र हिंदुस्थानचा संघ दुखापतीच्या फेऱ्यात अडकला असून दोन आघाडीचे खेळाडूला या लढतीला मुकणार आहे.
हिंदुस्थानचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकला नव्हता. दुसऱ्या सामन्यापूर्वी तो फीट होईल असे वाटत होते. परंतु रोहित दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. आता तो दुसऱ्या कसोटीतही खेळणार नसल्याचे बीसीसीआयने आज स्पष्ट केले. त्याच्यासह वेगवान गोलंदाज नवदीप सैनीही या लढतीला मुकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतही केएल राहुलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.
एकदिवसीय मालिकेदरम्यान रोहित शर्माच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखेखाली आहे. ढाका येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एक दिवसीय लढतीदरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्याची दुखापत बरी होण्यास आणखी काही कालावधी लागेल, त्यानंतर तो पुन्हा जोमाने मैदानात उतरेल, असे बीसीसीआयने सांगितले. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम लढतीपासून उपलब्ध नसेल.
दुसरीकडे नवदीप सैनी हा देखील दुसऱ्या लढतीला मुकणार आहे. पोटाचे स्नायू खेचले गेल्याने त्याला आराम देण्यात आला असून पुढील उपचारांसाठी तो एनसीएकडे जाणार आहे, अशीही माहिती बीसीसीआयने दिली.
NEWS – Rohit Sharma and Navdeep Saini ruled out of second Test against Bangladesh.
More details here – https://t.co/CkMPsYkvFQ #BANvIND pic.twitter.com/qmVmyU5bQ6
— BCCI (@BCCI) December 20, 2022
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ
केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.





























































