IND vs ENG – जुरेलची ‘संकटमोचक’ खेळी, टीम इंडियाचे रांची कसोटीत कमबॅक

उत्तर प्रदेशचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याने रांची कसोटीमध्ये आठवणीत राहणारी खेळी केली आहे. हिंदुस्थानचा डाव 7 बाद 177 असा संकटात सापडलेला असताना जुरेलने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरले आणि हिंदुस्थानची धावसंख्या 307 पर्यंत पोहोचवली. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली नाही.

दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या ध्रुव जुरेल याने रांचीच्या खराब होत चाललेल्या खेळपट्टीवर नेटाने सामना केला. 23 वर्षीय जुरेलने शतकापासून वंचित राहिला असला तरी त्याच्या 90 धावांच्या संकटमोचक खेळीमुळे हिंदुस्थानच्या संघाच्या कसोटीत कमबॅक केले आहे. जुरेलने 149 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 90 धावा केल्या. अखेरच्या गड्याच्या रुपाने तो बाद झाला. टॉम हर्टलीने त्याला एका अप्रतिम चेंडूवर बोल्ड केले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी घेता आली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा हिंदुस्थानने आपला पहिला डाव 7 बाद 219 वरून सुरू केला. त्यावेळी हिंदुस्थानचा संघ 134 धावांनी पिछाडीवर होता. खेळपट्टीचे स्वरुप पाहता हिंदुस्थानचा डाव 250 धावांमध्ये आटोपेल अशी शक्यता होती. मात्र ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादवने मैदानावर शड्डू ठोकत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. दोघांमध्ये 76 धावांची भागीदारी झाली. अँडरसनच्या गोलंदाजीवर कुलदीप 28 धावांची खेळी करू बाद झाल्यानंतर जुरेलने आक्रमक रुप धारण केले आणि चौकार-षटकारांची आतषबाजी सुरू केली. मात्र दुसऱ्या बाजुने आकाशदीप बाद झाला आणि त्यानंतर हर्टलीच्या चेंडूवर तो स्वत:ही बोल्ड झाला.

इंग्लंडकडून फिरकीपटू शोएब बशीर याने विकेटचा पंच ठोकला. त्याने 44 षटकांची गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. टॉम हर्टलीला तीन, तर जेम्स अँडरसनला दोन विकेट्स मिळाल्या. रॉबिन्सन आणि रूटची विकेटची पाटी कोरी राहिली.

पुढचा धोनी

दरम्यान, रांची कसोटीत दमदार अर्धशतक ठोकणाऱ्या जुरेलचे सुनील गावसकर यांनी कौतुक केले आहे. गावसकर यांनी जुरेलचा पुढचा धोनी असा उल्लेख केला. त्याच्यात धोनीची झलक दिसत असल्याचे ते म्हणाले.