Ind VS Eng 4th Test : पदार्पणात आकाशदीपची कमाल, इंग्लंडचा डाव सावरत जो रुटने ठोकले शतक

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे सुरू झाला. जसप्रीत बुमराहला या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अंतिम 11मध्ये आकाशदीपला खेळण्याची संधी देण्यात आली आहे. आकाशदीपने संधीचे सोने करत भेदक मारा केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 302 धावा केल्या आहेत.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला आकाशदीपच्या भेदक माऱ्याचा सामना करावा लागला. आकाशदीपने पदार्पणाच्या पहिल्या स्पेलमध्ये 7 षटके टाकली आणि 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे चौथ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात हिंदुस्थानचे वर्चस्व पहायाला मिळाले. इंग्लंडचा निम्मा संघ 112 धावांवर तंबूत परतला होता. आकाशने एकाच षटकात दोन विकेट घेतल्या त्याने बेन डेकेट (11) तर ऑली पोपला भोपळा सुद्धा फोडू दिला नाही. त्यानंतर 42 धावा करून अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या क्रॉलीचा त्रिफळा आकाशने उडवला. त्यानंतर आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि जो रुट यांनी इंग्लंडचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली.

हिंदुस्थानसाठी डोकेदुखी ठरत चाललेल्या बेअरस्टो आणि जो रुट यांची जोडी आर अश्विनने तोडली. अश्विनने बेअरस्टोला (38) धावांवर पायचीत केले. तर रवींद्र जडेजाने कर्णधार बेन स्टोक्सला (3) धावांवर बाद करुन पाचवा धक्का दिला. इंग्लंडचा डाव खऱ्या अर्थाने सावरला तो आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या जो रुटने, त्याने चांगला खेळ करत कारकिर्दीतील 31वे शतक झळकावले. जो रुटला बेअरस्टो आणि बेन फोक्स यांनी चांगली साथ दिली. बेन फोक्सने 47 धावा केल्या आणि तो रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन परतला. रुटने 219 चेंडूंत कसोटीतील 31वे आणि हिंदुस्थानविरुद्धचे 10वे शतक पूर्ण केले. या शतकासोबत जो रुट हिंदुस्थाविरुद्ध 10 कसोटी शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. रुटने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऑली रॉबिन्सनच्या सोबतीने महत्वपूर्ण 57 धावांची भागीदारी केली. रुट (106) व रॉबिन्सन (32) या दोघांच्या भागीदारीमुळे दिवसअखेर इंग्लंडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 302 धावा केल्या आहेत.