दुखापतींची मालिका सुरू आहे

इंग्लिश फिरकीपटू जॅक लीचसुद्धा बाहेर

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील दुखापतींच्या मालिकेने तीव्र रूप घेतले असून आता यजमानांपाठोपाठ पाहुण्यांच्याही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत वाढत चाललीय. आगामी तिसऱया कसोटीपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसलाय. त्यांचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीतून न सावरल्यामुळे उर्वरित मालिकेस मुकला आहे. लीच हिंदुस्थानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळला होता. आता तो मायदेशात परतणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून याची माहिती दिली. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यातील हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत लीचने इंग्लंडच्या विजयात दुखापतग्रस्त असूनही आपली भूमिका बजावली होती. त्याने पहिल्या आणि दुसऱया डावात 1-1 बळी टिपला होता. दरम्यान, सामना सुरू असताना त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱया कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. आता तो पूर्ण मालिकेलाच मुकला आहे. ही खेळपट्टी फिरकीला पोषक मानली जाते. त्यामुळे अनुभवी लीचची उणीव इंग्लंडला पुढच्या तीन कसोटीत नक्कीच जाणवेल.