INDvsENG ‘टीम इंडिया’ फॉलोऑनच्या छायेत, पुजारा, पंत यांची झुंजार अर्धशतके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाहुण्या इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभारला. मात्र प्रत्युत्तरादाखल यजमान हिंदुस्थानचा प्रतिकार तोकडा पडला. चेतेश्वर पुजारा (73) व रिषभ पंत (91) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा प्रतिकार केल्याने हिंदुस्थानला 74 षटकांत 6 बाद 257 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. रिषभ पंतचे हुकलेले शतक हिंदुस्थानी चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी ‘टीम इंडिया’ला 379 धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. म्हणजेच फॉलोऑन टाळण्यासाठी हिंदुस्थानला अजूनही 121 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर 33, तर रविचंद्रन अश्विन 8 धावांवर खेळत होते.

आघाडीच्या फळीचा फ्लॉप शो

इंग्लंडच्या फलंदाजांनी ज्या चेपॉकच्या खेळपट्टीवर पहिले दोन दिवस वर्चस्व गाजविले त्याच खेळपट्टीवर हिंदुस्थानच्या आघाडीच्या रथी-महारथी फलंदाजांनी फ्लॉप शो केला. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 44 धावांत हिंदुस्थानची सलामीची जोडी तंबूत धाडून इंग्लंडला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याने रोहित शर्माला (6) चकवून यष्टीमागे बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले, तर जेम्स अॅण्डरसनने शुभमन गिलचा सुर मारून झेल टिपला.

पुजारा-पंत लढले म्हणून…

ऑस्ट्रेलिया दौरा गाजविणारे चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत पुन्हा एकदा हिंदुस्थानचा डाव संकटात असताना झुंजारपणे लढले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली म्हणून अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला. पुजाराने 73 धावांच्या खेळीत 143 चेंडूंना सामोरे जाताना 11 चौकार लगावले. रिषभ पंतने आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करताना 88 चेंडूंत 91 धावांची फटकेबाजी करताना 9 चौकारांसह 5 षटकारांचा घणाघात केला. डॉम बेसनेच या दोघांनाही बाद करून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर व रविचंद्रन अश्विन या जोडीने अधिक पडझड होऊ दिली नाही.

रिषभ पंत – पुन्हा शतक हुकले

यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या रिषभ पंतने मायदेशात कसोटीमध्ये फक्त तीन डावांत फलंदाजी करताना 92, 92, 91 अशा धावा केल्या. मायदेशात पहिल्या तीन डावांत 50 हून अधिक धावा करणारा पंत हा दुसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला. याआधी विराट कोहलीने पहिल्या पाच डावांत 52, 63, 58, 103 व नाबाद 51 अशा खेळ्या केल्या आहेत. पंतचे हे कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक होय. चेतेश्वर पुजारानेही मागील पाच डावांत चौथी अर्धशतकी खेळी करून कामगिरीतील सातत्य दाखविले.

डोम बेसचा डबल धमाका

हिंदुस्थान दौऱ्यावर प्रथमच खेळणाऱ्या नवख्या डोम बेसने विराट कोहली (11) आणि अजिंक्य रहाणे या मोठय़ा फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. या दोघांना लागोपाठच्या षटकात बाद करून त्याने डबल धमाका केला. आधी कोहलीला शॉर्ट लेगला ऑली पोपकरवी झेलबाद केल्यानंतर पुढच्याच षटकात त्याने रहाणेलाही जो रुटकरवी झेलबाद करून हिंदुस्थानची 26.3 षटकांत 4 बाद 73 अशी दुर्दशा केली.

बुमराह-अश्विन यांचे 3-3 बळी

इंग्लंडने पहिल्या डावात 8 बाद 555 धावसंख्येवरून रविवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. शनिवारच्या धावसंख्येत 23 धावांची भर घालून इंग्लंडचा पहिला डाव 190.1 षटकांत 578 धावांवर संपला. जसप्रीत बुमराहने डॉम बेसला (34) पायचित करून इंग्लंडला नववा धक्का दिला, तर रविचंद्रन अश्विनने जेम्स अॅण्डरसनचा (1) त्रिफळा उडवून पाहुण्यांचा डाव संपवला. हिंदुस्थानकडून बुमराह व अश्विन यांनी 3-3 बळी टिपले, तर इशांत शर्मा व शाहबाज नदीम यांनी 2-2 फलंदाजांना बाद केले.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव – 578 धावा

हिंदुस्थान पहिला डाव – रोहित शर्मा झे. बटलर गो. आर्चर 6, शुभमन गिल झे. अॅण्डरसन गो. आर्चर 29, चेतेश्वर पुजारा झे. बुर्न्स गो. बेस 73, विराट कोहली झे. पोप गो. बेस 11, अजिंक्य रहाणे झे. रूट गो. बेस 1, रिषभ पंत झे. लिच गो. बेस 91, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 33, रविचंद्रन अश्विन खेळत आहे 8.

अवांतर – 5, एकूण – 74 षटकांत 6 बाद 257 धावा.

गोलंदाजी – जेम्स अॅण्डरसन 11-3-34-0, जोफ्रा आर्चर 16-3-52-2, बेन स्टोक्स 6-1-16-0, डोम बेस 23-5-55-4.