
गुवाहटी कसोटीवर दक्षिण आफ्रिकेने आपला दबदबा निर्माण केला आहे. दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून बिनबाद 26 धावा करत 314 धावांची आघाडी घेतली आहे. मार्को यान्सनच्या अचूक माऱ्यापुढे टीम इंडियाच्या फलंदजांचा निभाव लागला नाही. त्याने विकेट्सचा षटकार मारत विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव फक्त 201 धावांमध्ये संपुष्टात आला.
मार्को यान्सनने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने 91 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 93 धावांची झुंजार खेळी केली. तसेच गोलंदाजी करताना टीम इंडियाची भंबेरी उडवून दिली. त्याने 48 धावा खर्च करत महत्त्वपूर्ण 6 विकेट घेतल्या. या सहा विकेट्स घेत त्याने नवा इतिहास रचला असून मागील 15 वर्षांत अशी कामगिरी करणारा तो पहिला डावखूरा गोलंदाज ठरला आहे. मार्को यान्सन 2010 सालानंतर हिंदुस्थानात चार किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सन याने 2010 साली मोहाली कसोटीमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या.

























































