19 डिसेंबरला दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची बैठक

भाजपविरोधात एकजुटीने उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीची पुढील बैठक 19 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीत होणार आहे. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज माहिती दिली.

दिल्लीत 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीतील नेत्यांची चौथी बैठक होईल, अशी पोस्ट जयराम रमेश यांनी एक्सवर केली आहे. 6 डिसेंबर रोजी ही बैठक होणार होती. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आजारपण आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या व्यस्ततेमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता सर्व नेत्यांशी समन्वय साधून या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

भाजप आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरोधात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जदयू, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष यासह देशातील 27 पक्ष एकजूट झाले आहेत. 2024च्या निवडणुकीत मोदी सरकारला हटवण्यासाठी इंडियाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यानुसार ‘मी नव्हे आम्ही’ अशी वज्रमूठ आवळून पुढील वाटचाल करण्याचा निर्धार येत्या बैठकीत केला जाणार आहे.

– पाच राज्यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. तेलंगणात काँग्रेसचा विजय झाला तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पराभव झाला. यावर बैठकीत मंथन होणार.
– संयुक्त प्रचारसभा व राज्यनिहाय जागावाटपावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.