India Pakistan Ceasefire : दोन्ही देशांमध्ये समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती – संरक्षण मंत्रालय

हिंदुस्थान आणि पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात एकमत झालं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत दिली. याच संदर्भात आता संरक्षण मंत्रालयानेही पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे की, हिंदुस्थान आणि पाकिस्तानात समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती झाली आहे. या पत्रकार परिषदेत लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि नौदलाचे कमोडोर रघु आर नायर उपस्थित होते.

या संदर्भात माहिती देताना पत्रकार परिषदेत कमोडोर रघु आर नायर म्हणाले की, “समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यासाठी सहमती झाली आहे. हिंदुस्थानी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला या कराराचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

ते म्हणाले आहेत की, “पाकिस्तानच्या कृत्याला कडक प्रत्युत्तर देण्यात आले आहे, जर तणाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांना निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.”

याच पत्रकार परिषदेत बोलताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, “हिंदुस्थानी सशस्त्र दल हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज, सतर्क आणि पूर्णपणे वचनबद्ध आहेत.”