
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वन डे क्रिकेट मालिकेसाठी हिंदुस्थानच्या पुरुष क्रिकेट संघाची शनिवारी घोषणा झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव जुरेल यांना संघातून वगळण्यात आले आहे. कर्णधार शुभमन गिल व अनुभवी श्रेयस अय्यर यांचीही अपेक्षेप्रमाणे संघात वर्णी लागली आहे.
शुभमन गिलकडे पुन्हा एकदा टीम इंडियाच्या वन डे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून, श्रेयस अय्यरची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, श्रेयसचा संघातील समावेश फिटनेस क्लीअरन्सवर अवलंबून असल्याचे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळताना पोटाच्या स्नायूला गंभीर दुखापत झाल्यानंतर श्रेयस सध्या पुनर्वसन प्रक्रियेत आहे. तो मंगळवारी (दि. ६) जयपूर येथे होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीतील मुंबईच्या पुढील सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये मालिका जिंकणाऱ्या संघातील ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव जुरेल यांच्या जागी गिल आणि श्रेयस यांचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळताना शतक झळकावूनही ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळाले नाही. विशेष म्हणजे तो मुख्यत्वे राखीव सलामीवीर म्हणून निवडण्यात आला होता. त्यामुळे त्याला संधी न मिळाल्याचे दुर्दैव मानले जात आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने संघातील आपले स्थान कायम राखले असून, ईशान किशनला या मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही.
११ ते १८ जानेवारीदरम्यान ३ वन डे सामने
हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका ११ ते १८ जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. वडोदरा, राजकोट आणि इंदूर येथे हे तिन्ही सामने होतील. दरम्यान, बीसीसीआयने टी-२० मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा आधीच केली असून, पाच सामन्यांची टी-२० मालिका २१ ते ३१ जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे.
शमीला पुन्हा डावलले!
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संघात परतला असून, त्याच्यासोबत अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा हे इतर प्रमुख वेगवान गोलंदाज असतील. नितीशकुमार रेड्डीला हार्दिक पंड्याच्या जागी अष्टपैलू वेगवान गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराप्रमाणेच हार्दिक पंड्यालाही विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, मोहम्मद शमीला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याला प्रत्येक वेळी का डावलण्यात येते, हाच त्याच्या चाहत्यांचा खरा प्रश्न आहे.
हिंदुस्थानचा वन डे संघ (न्यूझीलंडविरुद्ध) –
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), बॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीशकुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.

























































