हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया वानखेडेवर भिडणार, आजपासून स्टार खेळाडूंमध्ये रंगणार द्वंद्व

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मंगळवारपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघांतील स्टार व दिग्गज खेळाडूंमधील द्वंद्व पाहायची संधी तमाम मुंबईकरांना मिळणार आहे. रोहित शर्मा-मिचेल स्टार्क, विराट कोहली-पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह-डेव्हिड वॉर्नर यांच्यामधील लढाई या लढतीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल. याप्रसंगी पहिली लढत जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी दोन संघांमध्ये चढाओढ लागेल यात शंका नाही.

ऑस्ट्रेलियाचे पारडे जड
हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या वन डे लढतींच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकता पाहुण्या कांगारूंचे पारडे जड आहे असे प्रकर्षाने जाणवते. दोन देशांमध्ये झालेल्या 142 सामन्यांपैकी 50 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवलाय, तर 77 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारलीय. तसेच दोन देशांमध्ये झालेल्या 57 मालिकांपैकी 14 मध्ये हिंदुस्थानने विजय मिळवलाय, तर 26 मालिका जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश लाभले आहे. हिंदुस्थानने इंग्लंडमधील वर्ल्ड कप लढतीत कांगारूंना हरवले असले तरी त्याआधी हिंदुस्थानात झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने सरशी साधली आहे.

रोहित, शिखर, राहुल हे तिघेही खेळू शकतात
पहिल्या वन डे लढतीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला सलामीबाबतच्या पर्यायासाठी विचारले असता तो म्हणाला, रोहित शर्मा, शिखर धवन व लोकेश राहुल हे तिघेही अंतिम अकरामध्ये खेळू शकतात. फलंदाज चांगल्या फॉर्मात असल्यास त्यांना संधी देणे गरजेचे आहे. तसेच त्यामुळे मला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागल्यास तरी चालेल. माझ्यासाठी ही असुरक्षिततेची भावना नसेल, असे तो पुढे स्पष्ट म्हणाला.

हाऊसफुल्ल
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या वानखेडे स्टेडियमवर होणारा पहिला वन डे सामना ‘हाऊसफुल्ल’ झाला आहे. या लढतीसाठी साडेसातशे रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंत तिकिटांचे दर ठेवण्यात आले असून मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील पदाधिकाऱयांशी याबाबत संवाद साधला असता ते म्हणाले, या वर्षी वानखेडे स्टेडियमवर पहिली वन डे लढत होत असून या लढतींची तिकिटे विकली गेली आहेत.

मार्नसवर साऱ्यांच्या नजरा
डेव्हिड वॉर्नर, स्टीवन स्मिथ, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड या स्टार खेळाडूंच्या समावेशामुळे कांगारूंचा संघ तगडा आहे. पण या दौऱ्यामध्ये साऱयांच्या नजरा असतील त्या मार्नस लॅबुशेन या युवा खेळाडूवर. या खेळाडूने कसोटींमध्ये धावांचा पाऊस पाडलाय.

विराटकडे सचिनशी बरोबरी साधण्याची संधी
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे उद्या वानखेडे स्टेडियमवर ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे. सचिन तेंडुलकरने मायदेशात 20 वन डे शतके झळकाविली आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत मायदेशात 19 शतके फटकाविली असून उद्या मुंबईत त्याने शतक मारल्यास त्याला सचिन तेंडुलकरच्या 20 शतकांची बरोबरी करता येणार आहे.

आजची पहिली वन डे लढत
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया, मुंबई.
थेट प्रक्षेपण दुपारी 1.30 वाजता.

आपली प्रतिक्रिया द्या