कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा, हिंदुस्थानकडून कॅनडाचा 13-1 ने धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलामीच्या लढतीत फ्रान्सकडून पराभूत झालेल्या गतविजेत्या यजमान हिंदुस्थानने कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील दुसऱया साखळी लढतीत कॅनडाचा 13-1 गोल फरकाने धुव्वा उडविला. यजमान संघाला सलामीला फ्रान्सकडून चुरशीच्या लढतीत 5-4 असा पराभव पत्करावा लागला होता.

लढतीच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱया हिंदुस्थानला तिसऱयाच मिनिटाला फायदा झाला. उत्तम सिंहने डावीकडून आलेल्या पासवर सुरेख मैदानी गोल करून हिंदुस्थानचे खाते उघडले. मग कर्णधार विवेक सागर प्रसादने ही आघाडी 2-0ने वाढविली. दुसरा हाफ सुरू होताच संजयने आणखी एक गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 5-1ने वाढविली. लढतीत 35व्या मिनिटाला शारदा नंद तिवारीने पेनल्टी कॉर्नरवर हिंदुस्थानसाठी सहावा गोल केला. 40व्या मिनिटाला यजमान संघाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. अरेजीत सिंह हुंदलने त्याचे गोलमध्ये रूपांतर करीत हिंदुस्थानला 7-1 असे आघाडीवर नेले. कॅनडाची बचाव फळी यावेळी निप्रभ दिसली. तिसरा क्वार्टर संपला तेव्हा पाहुण्यासंघाची दमछाक झाली होती. संजय व हुंदल यांनी सुरेख खेळ केला. अखेरचा क्वार्टर सुरू होताच उत्तम सिंहने आणखी एक गोल करुन हिंदुस्थानची आघाडी 8-1 केली. त्यानंतर हुंदलने 9वा गोल केला. काही सेंकंदानंतर गोलची हॅट्ट्रिक साजरी करीत त्याने हिंदुस्थानची आघाडी 10-1 अशी वाढविली. शारदा नंद तिवारीने हिंदुस्थानसाठी 11वा गोल केला.