मोटेरावर पाहुण्यांचे ‘मातेरे’, ‘गली बॉय’ अक्षरच्या फिरकीपुढे गोऱयांचे सपशेल लोटांगण

चेन्नईत विजय मिळवणाऱया आणि चार कसोटी लढतींच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधणाऱया पाहुण्या इंग्लंड संघाची अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर गुजरातचा ‘गली बॉय’ अक्षर पटेल आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांच्या अफलातून फिरकी माऱयापुढे पुरती भंबेरी उडाली. मोटेरा या जगातील सर्वात मोठय़ा स्टेडियमवरील तिसऱया दिवस-रात्र कसोटी लढतीत टीम इंडियाने दोनच दिवसांत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. या पराभवासह इंग्लंडचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर हिंदुस्थानी संघाने चौथी कसोटी ड्रॉ जरी केली तरी ते फायनलमध्ये पोहोचू शकतील. याउलट इंग्लंडने चौथा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये पोहोचेल.

अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमवरील तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना दोनच दिवसांत संपला. विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने 10 गडी राखून अहमदाबाद कसोटी जिंकली. फिरकी गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर दुसऱया दिवशी तब्बल 17 फलंदाज बाद झाले. ‘टीम इंडिया’ने विजयासाठी मिळालेले 49 धावांचे आव्हान केवळ 7.4 षटकांत एकही फलंदाज न गमावता पूर्ण केले. रोहित शर्मा 25, तर शुभमन गिल 15 धावांवर नाबाद राहिला. या विजयासह ‘टीम इंडिया’ने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

22 कसोटी दोन दिवसांत संपल्या
144 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 22 कसोटी सामन्यांचा निकाल हा दोन दिवसांत लागलेला आहे. हिंदुस्थानात दोन दिवसांत कसोटी संपल्याची ही दुसरी वेळ होय. याआधी हिंदुस्थानने 2018 साली अफगाणिस्तानचा बंगळुरू कसोटीत दोन दिवसांत पराभव केला होता.

इंग्लंडचे आव्हान संपले

अहमदाबाद कसोटीत विजयामुळे हिंदुस्थानची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठण्याची आशा पल्लवित झाली आहे. मात्र दुसरीकडे आजच्या पराभवामुळे इंग्लंडचे जागतिक कसोटी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. कारण इंग्लंडने चौथी आणि अखेरची कसोटी जिंकली तरी ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये दाखल होईल. हिंदुस्थानने चौथी कसोटी अनिर्णित राखली तरी त्यांचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचे तिकीट बुक होणार आहे. न्यूझीलंडने आधीच या स्पर्धेची फायनल गाठलेली आहे.

अश्विनचे 400 कसोटी बळी

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत गुरुवारी 400 कसोटी बळींचा टप्पा गाठला. जोफ्रा आर्चरला बाद करताच 400 कसोटी बळी टिपणारा अश्विन हिंदुस्थानचा चौथ्या, तर क्रिकेट विश्वातील 17 वा गोलंदाज ठरला. याआधी कपिलदेव, अनिल कुबळे आणि हरभजन सिंग या हिंदुस्थानी गोलंदाजांनी हा पराक्रम केलेला आहे. 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया अश्विनने 77 व्या कसोटीत 400 बळींचा टप्पा पार केला आहे. जलद 400 बळी टिपण्यामध्ये अश्विन दुसऱया क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने 72 व्या कसोटी सामन्यांत हा पराक्रम केलेला आहे. 400 कसोटी बळी घेणारे सर्वाधिक चार गोलंदाज हिंदुस्थानचेच आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजच्या प्रत्येकी दोन गोलंदाजांनी 400 किेवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका गोलंदाजाने 400 बळींचा टप्पा ओलांडलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या