
‘जेन झी’च्या आंदोलनामुळे माजलेल्या अराजकाचा फायदा घेऊन नेपाळच्या डझनभर तुरुंगांतून तब्बल 15 हजारांहून अधिक कैदी पळाले आहेत. यातील बहुतेक कैदी आश्रयासाठी हिंदुस्थानात येण्याची शक्यता असल्याने सीमेवर टेन्शन वाढले आहे. पश्चिम बंगाल, यूपी, बिहारला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवर सशस्त्र सीमा बल अलर्ट झाले असून आतापर्यंत 60 घुसखोरांना पकडण्यात आले आहे.
बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व सिक्कीम या 5 राज्यांना नेपाळची सीमा लागून आहे. नेपाळमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर हिंदुस्थान सरकारने सीमावर्ती भागातील सुरक्षा वाढवली आहे. वाहतुकीवरही बरेच निर्बंध आले आहेत. अशातच मागच्या दोन दिवसांत नेपाळ व हिंदुस्थानच्या सीमेवर 60 घुसखोरांना पकडण्यात आले आहे. यातील बहुतेक लोक नेपाळच्या जेलमधून फरार झालेले कैदी असल्याचे समजते.
वैध ओळखपत्र असलेल्यांना प्रवेश
अराजकाच्या खाईत अडकलेल्या नेपाळला हिंदुस्थानकडून सर्व सहकार्य केले जात आहे. वैध ओळखपत्रांसह हिंदुस्थानात येणाऱयांना प्रवेश दिला जात आहे. हिंदुस्थानचे सशस्त्र सीमा बल नेपाळी सुरक्षा दलाच्या संपका&त आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांनी संयुक्त गस्तही सुरू केली आहे. एसएसबीने स्वतंत्र फ्लॅग मार्च काढून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार असल्याचा संदेशही दिला आहे.