
चीनचा घुसखोरीचा डाव फसल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिंदुस्थानसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर बुधवारी चीनने पत्रकार परिषद घेऊन सीमीरेषेवर तणाव वाढवण्यासाठी हिंदुस्थान जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच हिंदुस्थानच्या करवाईमागे तिबेट आणि अमेरिकेचे सहकार्य असून यामागे अमेरिकेचा हात असल्याचा नवा कांगावाही चीनकडून करण्यात येत आहे. घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर चीनने पुन्हा एकदा तिबेटचा राग आलापला आहे.
हिंदुस्थानने दोन्ही देशात झालेल्या सहमतीचे उल्लंघन करत वास्तविक नियंत्रण रेषा पार केल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्यांनी केला. चीनच्या या आरोपांचे हिंदुस्थानने याआधीच खंडन केले आहे. त्यामुळे आता या वादात चीनने तिबेटचा राग आलापण्यास सुरुवात केली आहे. तसेच हिंदुस्थानच्या कारवाईमागे अमेरिकेचा डाव असल्याचा कांगावाही चीनने केला आहे. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांना तिबेटचे नागरिक मदत करत आहे काय, असा सवाल विचारण्यात आल्यावर चीनच्या प्रवक्ताचा राग अनावर झाला. हा प्रश्न हिंदुस्थानलाच विचारा, असे त्यांनी सांगितले. तिबेटचे नागरिक आणि अमेरिकेची सीआयए यांच्यात चांगले संबंध आहेत. तिबेटच्या नागरिकांना आश्रय देणाऱ्या हिंदुस्थानसह प्रत्येक देशाचा आम्ही निषेध करतो, असे चीनने म्हटले आहे. आता चीनला तिबेटकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल, या घडामोडींमागे अमेरिकेचा हात आहे. हिंदुस्थानी लष्कराचे जवान आणि तिबेटचे नागरिक यांच्या काय संबंध आहेत, याकडेही चीन लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.
लडाखमध्ये हिंदुस्थानी लष्कराच्या विकास रेजिमेंटने चीनला चोख प्रत्युत्तर दिले. त्यात मूळच्या तिबेटच्या असणाऱ्या काही जवानांचा समावेश आहे. या जवानांना पहाडी भागाची चांगली माहिती असते. तसेच ते डोंगराळ भागात चपराईने कारवाई करू शकतात. विकास रेजिमेंटमध्ये तिबेटचे जवान असल्याने आणि त्यांना या भागाची चांगली माहिती असल्याने चीनच्या कुरापतींना हिंदुस्थान चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे चीनकडून आता नवा कांगावा करण्यात येत आहे.
























































