
कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केल्यानंतर केंद्र सरकार आता नोकरदारांना दिवाळीपूर्वी आयकर कपातीची गिफ्ट देणार असल्याची शक्यता आहे. दहा लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील आयकर 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणण्याची शिफारस केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) केली आहे. त्याआधारे सरकार मागणीत वाढ आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आयकरात कपात करण्याचा विचार करत आहेत.
सरकारने अलीकडेच कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आणला आहे. त्यापाठोपाठ आता दिवाळीपूर्वी नोकरदारांना दिलासा दिला जाणार आहे. अखिलेश रंजन यांच्या नेतृत्वाखालील सीबीडीटीने आयकर कायदा सोपा बनवण्याची शिफारस केली आहे. तसेच कराचा भार हलका करण्यासाठी सेस, सरचार्ज आदी हटवून 10 लाख ते 20 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आकारण्यात येणारा 30 टक्क्यांचा आयकर 25 टक्क्यांवर आणण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. महसूल व इतर परिस्थितींचा विचार करून प्रत्येक करदात्याला कमीत कमी पाच टक्क्यांची सूट देण्याचा सरकारचा विचार आहे.
नोकरदारांच्या हातात पैसा खेळता राहील
सध्या आर्थिक मंदीला सामोरे जात असलेल्या नोकरदारांच्या हातात पैसा खेळता राहील यादृष्टीने सरकारकडून आयकर कपातीबाबत विचार केला जात आहे. त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून सक्षम प्राधिकरणाकडे या करकपातीचा अहवाल सोपवला जाईल. ते प्राधिकरण अहवालावर निर्णय घेईल. या निर्णयाची दिवाळीपूर्वीच घोषणा होईल अशी शक्यता वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे.
























































