
पाकिस्तानातील कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या हिंदुस्थानातील श्रद्धाळू शीख भाविकांसाठी पाकिस्तान सरकारने सवलतींचा पाऊस पाडला आहे. शीख भाविकांना पासपोर्टशिवाय केवळ ओळखपत्राच्या आधारे कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला असून कॉरिडॉरच्या उद्घाटनादिवशी विनामूल्य दर्शनाची सोयदेखील करण्यात आली आहे. तसेच दहा दिवस आधी नावनोंदणी करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
हिंदुस्थानी सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर हिंदुस्थानातील गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबरला या कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी हिंदुस्थानी भाविकांना विनामूल्य दर्शनाची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर दररोज पाच हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. यासाठी भाविकांकडून 1420 रुपये आकारण्यात येणार आहे.g
– हिंदुस्थानातील ज्या भाविकांना कर्तारपूर कॉरिडॉरला भेट देण्यासाठी पाकिस्तानने निमंत्रित केले आहे अशा भाविकांना यात्रेपूर्वी केंद्र सरकारकडे पाकिस्तानात जाण्यासाठी मंजुरी घेणे आवश्यक आहे.
– हिंदुस्थानने उद्घाटन समारंभात सहभागी होणाऱया हिंदुस्थानातील केंद्रीय मंत्री आणि अन्य भाविकांसह 450 आणि अन्य 31 लोकांच्या नावाची सूची पाकिस्तानला मंजुरीसाठी पाठविली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी स्पष्ट केले.
– मागील बैठकीवेळी हिंदुस्थानने दर्शनासाठी आकारण्यात येणाऱया शुल्कावर पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केली होती. तसेच याविषयी पुनर्विचार करण्याची मागणीदेखील करण्यात आली होती.
पाकिस्तानची दररोज एक लाख डॉलर्सची कमाई
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात झालेल्या सामंजस्य करारानुसार दररोज पाच हजार भाविकांना दरबार साहिब जाण्याची परवानगी मिळणार आहे. यातून पाकिस्तानची दररोज सुमारे एक लाख डॉलर्सची कमाई होणार आहे. याचा अर्थ एका वर्षात 3 कोटी 65 लाख डॉलर्सचे उत्पन्न पाकिस्तानला मिळणार आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानी रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 155.72 रुपये इतके आहे.
























































