
मध्यपूर्वेतील युद्ध आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानने आपल्या सीमांच्या संरक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रशियाकडून जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी एस-४०० (S-400) सुदर्शन हवाई संरक्षण प्रणालीच्या आणखी ५ नवीन स्क्वॉड्रन खरेदी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या करारामुळे हिंदुस्थानची आकाशातून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्याची क्षमता कित्येक पटीने वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या ५ नवीन स्क्वॉड्रनच्या समावेशामुळे हिंदुस्थानच्या ताफ्यात आता एकूण १० एस-४०० स्क्वॉड्रन होणार आहेत. ‘सुदर्शन’ असे नाव देण्यात आलेली ही प्रणाली शत्रूची विमाने, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन ४०० किलोमीटर अंतरावरूनच टिपून नष्ट करण्यात सक्षम आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवरून उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा निर्णय अत्यंत धोरणात्मक मानला जात आहे.
यापूर्वीच्या करारातील काही स्क्वॉड्रन हिंदुस्थानला आधीच प्राप्त झाल्या असून, त्या सीमावर्ती भागात तैनात करण्यात आल्या आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या संकटानंतरही, रशियाने हिंदुस्थानला या प्रणालीचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. या नवीन करारामुळे हिंदुस्थानच्या संरक्षण दलांची एअर डिफेन्स यंत्रणा आता अभेद्य होणार आहे.

























































