
कश्मीरचा मुद्दा पुनः पुन्हा उपस्थित करणारे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एर्दोगान यांना हिंदुस्थानने आज खडे बोल सुनावले. जम्मू-कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून आमच्या अंतर्गत विषयांमध्ये डोके खुपसू नका, असे एर्दोगान यांना हिंदुस्थानने बजावले आहे.
पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना एर्दोगान यांनी कश्मीरच्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करणार असल्याचे म्हटले होते. बरोबरच फायनान्शियल टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठीही पाकिस्तानला सहकार्य करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. एर्दोगान यांची कश्मीरसंदर्भातील सर्व विधाने आम्ही फेटाळून लावतो. टर्कीने सत्य काय आहे ते नीट समजून घ्यावे असे सांगतानाच पाकिस्तान प्रोत्साहित दहशतवादामुळे हिंदुस्थानला धोका आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया
देशांना या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात येते. या यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावरून आर्थिक मदत बंद होते. त्यामुळे या यादीतून बाहेर पडण्यासाठी
पाकिस्तान धडपडत आहे. त्याचाच प्रयत्न म्हणून पाकिस्तानने हाफीज सईदविरोधातील खटला जलदगतीने चालवला.



























































