पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून भारतभ्रमण, अकरा राज्यांतून केला 11 हजार कि. मी.चा प्रवास

पर्यावरणाचा दररोज होत असलेला ऱहास पाहून पर्यावरणाच्या रक्षणार्थ जनजागृतीसाठी बँकेतील नोकरी सोडून पश्चिम बंगालचे तीन तरुण सायकलवरून भारतभ्रमण करीत आहेत. देशभर शालेय मुलांसह देशवासीयांना पर्यावरणाचे रक्षण किती गरजेचे आहे, याचे धडे देत आहेत. आतापर्यंत सुमारे 11 हजार कि.मी.चा सायकल प्रवास केलेल्या या तिघांनी आज कोल्हापूरला भेट दिली. यांतील संगीता विश्वास या तरुणीचे धाडस कौतुकास्पद ठरत आहे. कोल्हापुरातील दोन दिवसांनंतर हे तिघे गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.

पश्चिम बंगालमधील चिंचोली हुबळी येथील प्रदीप विश्वास, संगीता विश्वास आणि अमित संगमा या तीन पर्यावरणप्रेमींनी 27 ऑक्टोबर 2022पासून ‘गो ग्रीन, सेव्ह अर्थ’ असा संदेश घेऊन पर्यावरण आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी भारतभर भ्रमंतीस सुरुवात केली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरयाणा, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र अशा 11 राज्यांतून सुमारे साडेअकरा हजार कि.मी.चा सायकल प्रवास त्यांनी केला आहे. आज हे तिघे कोल्हापुरात दाखल झाले. येथील पर्यावरणप्रेमींकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. दोन दिवसांच्या कोल्हापूर मुक्कामानंतर ते गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. अजूनही उर्वरित राज्यांचा प्रवास करण्यासाठी अडीच वर्षे लागणार असल्याचे प्रदीप विश्वास यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे धडे

देशभर पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश घेऊन सायकलवरून प्रवास करताना वाटेत येईल त्या शाळेमधील विद्यार्थ्यांना प्रदीप विश्वास, संगीता विश्वास, आणि अमित संगमा यांनी त्यांच्याकडील स्लाइड शोच्या माध्यमातून ‘पर्यावरण वाचवा’ ही संकल्पना शालेय विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, यासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. कोल्हापुरात नवीन राजवाडा बघायला आलेल्या मुलांना त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला.