
हिंदुस्थानचा शैलीदार फलंदाज लोकेश राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात शतकी धमाका केला. त्याच्या या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या डावात 90 षटकांत 3 बाद 272 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लोकेश राहुल 122, तर अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळत होते.
अन् 14 वर्षांची प्रतीक्षा संपली
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकेश राहुलच्या रूपाने हिंदुस्थानी सलामीवीराला कसोटी शतक झळकावण्यात यश आले. याआधी वसीम जाफरने सलामीवीर म्हणून 2007 साली केपटाऊन कसोटीत 116 धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेत सलामीवीर म्हणून पहिले कसोटी शतक झळकावले होते. राहुलने 217 चेंडूंत शतक पूर्ण केले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे सातवे, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले कसोटी शतक होय. परदेशातील राहुलचे हे सहावे कसोटी शतक होय. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या तीन देशांत कसोटी शतक ठोकणारा राहुल हा एकमेव हिंदुस्थानी फलंदाज होय हे विशेष.
राहुलचे शतक, मयांकचे अर्धशतक
हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल व मयांक अगरवाल (60) यांनी 117 धावांची खणखणीत सलामी देत आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. मयांकने 123 चेंडूंत 9 चौकारांच्या सहाय्याने कारकीर्दीतील सहावे कसोटी अर्धशतक झळकाविले. लुंगी एनगिडीने त्याला पायचित पकडून दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. मयांकने कारकीर्दीतील सहावे, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले कसोटी अर्धशतक झळकावले.
कोहली पुन्हा अपयशी
पुजाराच्या जागेवर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने 94 चेंडूंत 4 चौकारांसह 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, मात्र तो पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. दोन वर्षांपासून त्याने शतकी खेळी साकारलेली नाहीये. म्हणजेच मागील 59 डावांत त्याला शतक झळकावता आले नाही. लुंगी एनगिडीने कोहलीला मुल्डरकरवी झेलबाद केले. लुंगीने कसोटी कारकीर्दीत तिसऱ्यांदा कोहलीचा बळी मिळवला. पहिल्या दिवशी लुंगी एनगिडीनेच हिंदुस्थानच्या तीनही फलंदाजांना बाद केले.





























































