IND vs AUS मेलबर्नमध्येच होणार बॉक्सिंग डे कसोटी

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेवर बुधवारी अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 27 नोव्हेंबरपासून क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार असून 69 दिवसांच्या या दौऱयात दोन देशांमध्ये तीन वन डे, तीन टी-20 व चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात होणार आहे. याआधी मेलबर्न येथील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे बॉक्सिंग डे कसोटीसाठी अॅडलेड हा पर्याय ठेवण्यात आला होता, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीच्या आयोजनाची परंपरा कायम या वर्षी कायम ठेवण्यात आली.

हिंदुस्थानचा संघ आयपीएल आटोपल्यानंतर यूएईहून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. सिडनी येथे 14 दिवसांच्या विलगीकरणात टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना सरावासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच मेलबर्न व सिडनी येथे होणाऱया कसोटींच्या मध्ये सात दिवसांचा ब्रेकही देण्यात आला आहे. वन डे व टी-20 मालिका सिडनी व पॅनबेरा या दोनच ठिकाणी पार पडणार आहे.

कसोटी सामने अॅडलेड, मेलबर्न, सिडनी व ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येतील. हिंदुस्थानचा संघ कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे. हे सराव सामने 6 ते 8 डिसेंबर तसेच 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत असणार आहेत. 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत सिडनी येथे होणारा सराव सामना डे-नाईट असणार आहे. अॅडलेड येथे होणाऱया डे-नाईट कसोटीआधी हा सराव सामना असणार आहे.

– हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया मालिकेचा धमाका 27 नोव्हेंबरपासून
– क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर
– टीम इंडियाचा संघ डे-नाईट सराव सामना खेळणार
– 14 दिवसांच्या विलगीकरणात खेळाडू करणार सराव

हिंदुस्थान–ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक

पहिली वन डे – 27 नोव्हेंबर, सिडनी (डे-नाईट)
दुसरी वन ड – 29 नोव्हेंबर, सिडनी (डे-नाईट)
तिसरी वन डे – 2 डिसेंबर, पॅनबेरा (डे-नाईट)
पहिली टी-20 – 4 डिसेंबर, पॅनबेरा (नाईट)
दुसरी टी-20 – 6 डिसेंबर, सिडनी (नाईट)
तिसरी टी-20 – 8 डिसेंबर, सिडनी (नाईट)
पहिली कसोटी – 17 ते 21 डिसेंबर, अॅडलेड
(गुलाबी चेंडू, डे नाईट)
दुसरी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
तिसरी कसोटी – 7 ते 11 जानेवारी, सिडनी
चौथी कसोटी – 15 ते 19 जानेवारी, ब्रिस्बेन

25 हजार प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटीसाठी स्टेडियममध्ये दिवसाला तब्बल 25 हजार क्रिकेटप्रेमींना परवानगी देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, राज्य क्रीडामंत्री आणि तेथील सरकार यांच्यामध्ये याबाबत चर्चा सुरू आहे, मात्र अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाहीए.

आपली प्रतिक्रिया द्या