IND vs ENG Test – इंग्लंडने टॉस जिंकला; हिंदुस्थानची प्रथम गोलंदाजी, आकाश दीपचे पदार्पण

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आजपासून रांचीमध्ये सुरू झाला. मालिकेत 2-1 ने पिछाडीवर असणाऱ्या पाहुण्या इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानच्या संघात एक बदल करण्यात आला असून जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीपला अंतिम 11मध्ये स्थान मिळाले आहे. हिंदुस्थानकडून कसोटी खेळणारा तो 313 वा खेळाडू ठरला आहे.

हिंदुस्थानी संघाने चौथ्या कसोटीतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी आकाश दीप की मुकेश कुमार खेळणार यावर सस्पेन्स कायम होता. अखेर आकाश दीपला पदार्पणाची संधी मिळाली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला टॅस्ट कॅप सोपवली.

आकाश दीप याचा रेकॉर्ड चांगला आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध नुकत्यात झालेल्या 2 लढतीत त्याने 11 विकेट्स घेतल्या होत्या. आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणीचे 30 सामने खेळले असून यात त्याने 23.58च्या सरासरीने आणि 3.03च्या इकोनॉमीने 104 विकेट्स घेतल्या आहेत. रजत पाटीदार, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांच्यानंतर या कसोटी मालिकेद्वारे पदार्पण करणारा आकाश दीप चौथा खेळाडू आहे.

हिंदुस्थाना मालिकेत आघाडीवर

दरम्यान, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थान 2-1 ने आघाडीवर आहे. हैदराबाद कसोटी 28 धावांनी गमावल्यानंतर हिंदुस्थानने विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटीवर नाव कोरले. हिंदुस्थानने विशाखापट्टणम कसोटी 106, तर राजकोट कसोटी 434 धावांनी जिंकली होती. आता रांची कसोटी जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी हिंदुस्थान सज्ज आहे.

चौथ्या कसोटीसाठी हिंदुस्थानचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप