
हिंदुस्थानला 2021 सालामध्ये नॉनस्टॉप क्रिकेट खेळायचे आहे. हिंदुस्थानचा संघ पुढल्या वर्षी दोन वेळा इंग्लंडशी भिडणार आहे. सुरुवातीला मायदेशात आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून बुधवारी याबाबत घोषणा करण्यात आली. दोन देशांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये हिंदुस्थानात जानेवारी ते मार्च या कालावधीत क्रिकेट मालिका होणार आहे. या मालिकेत चार कसोटी सामने असणार आहे. त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत हिंदुस्थानचा संघ इंग्लंडशी पाच कसोटी सामन्यांमध्ये दोन हात करील. दोन देशांमधील पहिली कसोटी 4 ते 8 ऑगस्ट या कालावधीत ट्रेंट ब्रिज येथे तर अखेरची कसोटी 10 ते 14 सप्टेंबर या कालावधीत मँचेस्टर येथे होईल.
दरम्यान, इंग्लंडचा महिला क्रिकेट संघही मायदेशात क्रिकेट मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका आयोजनासाठी पुढाकार घेण्यात येत आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचे पुढील मोसमातील वेळापत्रक
श्रीलंकेविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका
(29 जूनपासून)
पाकिस्तानविरुद्ध वन डे,
टी-20 सामन्यांची मालिका
(8 जुलैपासून)
हिंदुस्थानविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका
(4 ऑगस्टपासून)

























































