
कसोटी क्रिकेटला बॅझबॉल शैलीने वेगवान आणि मनोरंजक करणारा इंग्लंडचा संघ एजबॅस्टन पराभवाने इतका भेदरलाय की, त्यांनी कधी नव्हे ते सावध कसोटी खेळ करण्याचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर सुरू झालेल्या तिसऱया कसोटीत इंग्लंडने कसोटी क्रिकेटला साजेसा सावध आणि संयमी खेळ केल्यामुळे पहिल्या दिवसअखेर त्यांनी 4 बाद 251 अशी समाधानकारक मजल मारली. खेळ थांबला तेव्हा ज्यो रुट 99 तर कर्णधार बेन स्टोक्स 39 धावांवर खेळत होते.
भेदरलेला अन् घाबरलेला इंग्लंड
मालिकेत आघाडी घेण्यासाठी लॉर्ड्सवर आज दोन्ही संघ उतरले. बेन स्टोक्सने टॉस जिंकण्याची हॅटट्रिक केली आणि चक्क प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय त्याने का घेतला याचा अंदाज ताबडतोब आला. त्यांच्या बॅझबॉल शैलीने त्यांना जसे यश दिलेय, तसेच त्यांना पराभवाची झळही सोसावी लागलीय. एजबॅस्टनवर त्यांचा बॅझबॉल त्यांना महागात पडल्याने त्यांच्यावर नेहमीप्रमाणे टीका झाली. पण कधीही आपली बॅझबॉल शैली न सोडणारा इंग्लंडचा संघ प्रथमच सावध खेळताना दिसताना. बेन डकेट आणि झॅक क्रावली हीच जोडी सलामीला उतरली, पण दोघांचीही देहबोली सावध आणि सामान्य होती. दोघेही हिंदुस्थानी गोलंदाजांवर तुटून पडले नाहीत. दोघांनी 13 षटकांत 43 धावाच केल्या होत्या.
रेड्डीने संधीच्या विकेट काढल्या
गेल्या कसोटीत हिंदुस्थानचे सर्वच खेळाडू जोरदार खेळले. आघाडी फलंदाजांनी आपापला वेगवान खेळ दाखवत हिंदुस्थानला वर्चस्व मिळवून दिले होते. पण शार्दुल ठाकूरच्या जागी संघात स्थान मिळवणाऱया नितीश कुमार रेड्डीने निराश केले. त्याला गोलंदाजीत फारशी संधी मिळाली नाही, पण फलंदाजीत तो दोन्ही डावांत एका धावेवर बाद झाला. या अपयशानंतरही लॉर्ड्सवर त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आपल्याला लाभलेल्या अनपेक्षित संधीचे सोने केले. इंग्लंडच्या डकेट-क्रॉवलीने हिंदुस्थानच्या बुमरा-सिराज-आकाशपुढे बचावात्मक खेळ करत 13 षटके खेळून काढली. तेव्हा गिलने नितीशच्या हातात चेंडू दिला आणि त्याने आपल्या पहिल्याच षटकात तिसऱया आणि सहाव्या चेंडूवर डकेट आणि क्रावलीला यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडत सनसनाटी सुरुवात केली. या दोन धक्क्यांमुळे बिनबाद 43 वरून 2 बाद 44 अशी इंग्लंडची अवस्था झाली. यानंतर पुढचे दीड सत्र ज्यो रुट आणि ओली पोपने सहजपणे खेळून काढत इंग्लंडला सावरले. इंग्लंडने आज धावा केल्या, पण त्यांच्या खेळातून बॅझबॉल शैली गायब झाल्यामुळे पहिला दिवस चुकचुकल्यासारखाच भासला. चहापानाला 2 बाद 153 अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंडला चहापानानंतरच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जाडेजाने धक्का दिला. मग बुमराने हॅरी ब्रुकचा त्रिफळा उडवत इंग्लंडला चौथा धक्का दिला.
मात्र त्यानंतर रुट आणि स्टोक्सने आपल्या बदललेल्या डावपेचांप्रमाणे बॅझबॉलला बाजूला ठेवत परंपरागत कसोटी क्रिकेट खेळण्यात धन्यता मानली. रुटने पोपसह तिसऱया विकेटसाठी 109 धावांची भागी रचल्यानंतर पाचव्या विकेटसाठी 79 धावांची भर घातली. कसोटी क्रिकेटमध्ये सचिनच्या विश्वविक्रमांचा पाठलाग करणारा रुट आपल्या 37 व्या कसोटी शतकापासून केवळ 1 धाव दूर आहे. गेली 3 वर्षे बॅझबॉल शैलीच्या नावाखाली साडेचार-पाच धावांच्या सरासरीने फटकेबाजी करणाऱया इंग्लंडने आज लॉर्ड्सवर 3 धावांच्या सरासरीने 83 षटकांत 251 धावा काढल्या. यात 25 चौकारांचा समावेश होता. एकाही फलंदाजाने षटकार ठोकला नाही.
हिंदुस्थानी संघ विश्वासाने उतरला
इंग्लंडने पराभवानंतरही आपला आत्मविश्वास दाखवताना आपल्या संघात केवळ एकच बदल केला होता. तर आपल्या अंतिम संघाबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवणाऱया हिंदुस्थानी संघाने इंग्लंडचा कित्ता गिरवताना आपल्याही संघात केवळ एकच बदल गेला. संघात किमान दोन किंवा तीन बदल होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने केवळ प्रसिध कृष्णाला बाहेर काढून जसप्रीत बुमराला स्थान दिले. तसेच करुण नायर, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर हे अपयशी ठरले असले तरी त्यांच्यावर विश्वास दाखवत लॉर्ड्सवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंड पहिल्यांदाच बॅझबालपासून दूर
मे 2022 मध्ये इंग्लिश कोच ब्रॅण्डन मॅकलम आणि बेन स्टोक्स यांनी फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, केवळ सकारात्मक म्हणजेच आक्रमक खेळ करण्याची नवी रणनीती आखली. या शैलीला त्यांनी प्रशिक्षक मॅकलम यांचे निकनेम बॅझवरून बॅझबॉल असे नाव दिले. तेव्हापासून इंग्लंडने आक्रमक आणि सकारात्मक खेळ करत कसोटी क्रिकेट अधिक रंगतदार केले. बॅझबॉलमुळे ते अनेक कसोटींत जिंकले, तर काही कसोटींत त्यांना हारही सहन करावी लागली. पण त्यांनी कधीही बॅझबॉल सोडले नव्हते. मात्र गेल्या कसोटीत एजबॅस्टनवर ते पराभवाने हादरले आणि अखेर त्यांनी बॅझबॉलला लॉर्ड्सपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आलेय.