
एजबॅस्टनवर तिरंगा फडकल्यामुळे हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने केवळ एका बदलासह संघ लॉर्ड्सवर उतरवला होता. मात्र लॉर्ड्स हातातून निसटल्यानंतर आता संघात काही बदल होण्याची शक्यता असून सलग तीन कसोटींत संधी मिळूनही विशेष काही करू न शकलेल्या करुण नायरला संघाबाहेर बसवण्याची जोरदार शक्यता आहे. तिसऱया स्थानावर खेळत असलेल्या नायरऐवजी साई सुदर्शन किंवा अभिमन्यू ईश्वरनपैकी कुणाला संधी द्यायची, याची गोळाबेरीज केली जात आहे.
विराट कोहलीच्या कसोटीनंतर त्याच्या रिक्त झालेल्या जागेला भरण्यासाठी करुण नायरची संघात निवड करण्यात आली आणि पहिल्या कसोटीत 0 आणि 8 धावा केल्यानंतरही त्याला एजबॅस्टनला खेळविण्याचे धाडस संघाने दाखवले. मग एजबॅस्टनवर 31 आणि 26 अशा खेळ्या केल्या. त्याचे अपयश हिंदुस्थानच्या विजयामुळे लपले आणि त्याला लॉर्ड्सवर पुन्हा संधी लाभली. पण तिसऱया कसोटीतही 40 आणि 14 असे डाव खेळून गेला. गेल्या सहा डावांत त्याला एकही अर्धशतक झळकवता आलेले नाही. 22 धावांच्या सरासरीने त्याने केवळ 131 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता त्याला बाहेर बसवण्याची संघव्यवस्थापनाची तयारी सुरू झाली आहे.