
सुमारे महिनाभर चाललेल्या थरारक लढतींनंतर आता टी-२० वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी, ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे. हिंदुस्थानच्या संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे तर, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवून फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.
सामना कधी आणि कुठे?
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा हायव्होल्टेज अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना हिंदुस्थानच्या वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. आणि टॉस (नाणेफेक) ६:३० वाजता होईल.
हिंदुस्थानच्या संघाकडे यंदा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्थानने हा सामना जिंकला, तर, टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरेल. विशेष म्हणजे, ही स्पर्धा हिंदुस्थानच्या घरच्या मैदानावर होत असल्याने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळणार आहे. दुसरीकडे, मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला असून त्यांच्या रणनीतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लाईव्ह प्रक्षेपण कुठे पाहाल?
हा थरारक सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल. तसेच, मोबाईल आणि ऑनलाईन प्रेक्षकांसाठी जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
हिंदुस्थानचा संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंडचा संघ – मिचेल सँटनर (कर्णधार), टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेम्स नीशम, जेकब डफी, काइल जेमिसन, डेव्हन कॉन्वे




























































