
हिंदुस्थानी क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर 19 जानेवारीपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकाही खेळणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच टीम इंडियाला एक धक्का बसलाय. त्यांचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पहिल्या वन डे सामन्यात तो खेळू शकेल का याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. दुखापतीमधून बाहेर आल्यानंतर सुंदरची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे, मात्र कोरोनाची लागण झाल्याने कदाचित तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण वन डे मालिकेसाठी आता फक्त एका आठवडय़ाचा कालावधी शिल्लक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वॉशिंग्टन सुंदर अद्यापि मुंबईतच आहे. वन डे मालिकेसाठी निवडण्यात आलेले अन्य काही खेळाडूदेखील मुंबईतच आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार हे खेळाडू बुधवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार सुंदर अन्य खेळाडूंसह आफ्रिकेला जाणार नाही. याचा अर्थ तो मालिकेतून बाहेर झाल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयने सुंदरच्या जागी अन्य खेळाडूचे नाव अद्याप जाहीर केले नाही.




























































