
हिंदुस्थानने दक्षिण कोरियाचा 4-2 गोल फरकाने पराभव करीत ज्युनियर हॉकी वर्ल्डमधील आपल्या मोहिमेचा धडाकेबाज प्रारंभ केला. अरिजीत सिंह हुंदलच्या हॅटट्रिकच्या जोरावर हिंदुस्थानने ही विजयी सलामी दिली.
अरिजीतने 11 व्या, 16 व्या आणि 41 व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हिंदुस्थानकडून आणखी एक झालेला गोल अमनदीपने 30 व्या मिनिटाला केला. दक्षिण कोरियाकडून दोह्युम लिमने 38 व्या, तर मिंकवोन किंमने 45 व्या मिनिटाला गोल केले.
भुवनेश्वरमध्ये 2021 ला झालेल्या या स्पर्धेत कास्यपदकाच्या लढतीत हिंदुस्थानचा फ्रान्सकडून पराभव झाला होता. आज मात्र, हिंदुस्थानने दक्षिण कोरियावर सुरुवातीपासून गाजवलेले वर्चस्व शेवटपर्यंत कायम राखले. अरिजीतने पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर अरिजीत व अमनदीप यांनी दुसऱया क्वार्टरमध्ये मैदानी गोल करून हिंदुस्थानची आघाडी 3-0 असे आणखी भरभक्कम केले.
मध्यंतरापर्यंत हिंदुस्थानकडे 3-0 अशी आघाडी होती, मात्र तिसऱया क्वार्टरमध्ये लिमने गोल करून कोरियाचे खाते उघडले. मात्र त्यांचा हा आनंद औटघटकेचा ठरला. अरिजीतने आणखी तीन मिनिटाने हिंदुस्थानसाठी चौथा गोल ठोकून स्वतःची हॅटट्रिकही साजरी केली. 4-1 ने आघाडी मिळाल्याने हिंदुस्थानी खेळाडू निश्चिंत झाले. याचाच फायदा उठवत किमने कोरियासाठी दुसरा गोल केला, मात्र त्यानंतर सावध झालेल्या हिंदुस्थानने बचावात्मक पवित्रा घेत कोरियाला आणखी गोल करण्याची संधी मिळू दिली नाही. हिंदुस्थानची गटफेरीतील आगामी लढत स्पेनशी होणार आहे.































































