दुबळ्या विंडीजसमोर हिंदुस्थानचे आव्हान, आज दुसरा वन डे सामना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

कसोटी मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या पाहुण्या वेस्ट इंडीजला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतही विराट कोहलीची सेना दयामाया दाखविण्याच्या मूडमध्ये नाही. गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत विंडीजने तीनशेहून अधिक धावसंख्या उभारली, मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या आघाडीच्या फळीने ही धावसंख्या अगदीच तोकडीच ठरविली. आता उद्या विशाखापट्टणममध्ये उभय संघ दुसऱया एकदिवसीय लढतीत भिडणार आहेत. विराटची सेना विजयाची लय राखण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल, तर विंडीजला गोलंदाजीत सुधारणा करून ‘टीम इंडिया’ला रोखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल.

विराट कोहली व रोहित शर्मा यांनी दणकेबाज शतके ठोकून गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत 246 धावांची भागीदारी करून सामना एकतर्फी केला होता. त्यामुळे मधल्या फळीच्या चाचपणीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. मात्र विंडीजने हिंदुस्थानी गोलंदाजीवर हल्लाबोल करून 322 धावा केल्या ही चिंताजनक बाब होय. भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांच्या गैरहजेरीत डेथ षटकांमध्ये हिंदुस्थानी गोलंदाजांना चांगलीच पडी पडली होती. रवींद्र जाडेजा व मोहम्मद शमी महागडे गोलंदाज ठरले. दुसऱया कसोटीत 10 बळी टिपणाऱया उमेश यादवलाही सलामीच्या वन डेत छाप सोडता आली नाही. तरीही त्याला उद्या संधी देण्याशिवाय कोहलीकडे पर्याय नसून खलील अहमदच्या जागेवर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला खेळविण्याची शक्यता वाटते.

विंडीजला पहिल्या वन डेतील शतकवीर शिमरोन हेटमेयरकडून पुन्हा एकदा चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल. मार्लोन सॅम्युएल्सला पहिल्या लढतीत भोपळाही फोडता आला नव्हता, मात्र त्याचा दिवस असल्यास प्रतिस्पर्धी संघाचे काही खरे नसते. प्रमुख गोलंदाज केमार रोचला आपला संपूर्ण अनुभव पणाला लावावा लागेल.

कोहली होणार दसहजारी
विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये दसहजारी मनबसदार बनण्याची संधी असेल. विंडीजविरुद्ध उद्या 81 धावा केल्यानंतर विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा वेगवान दहा हजार एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम कोहली मोडेल. सचिनने 259 डावांत दहा हजार धावा केल्या होत्या, तर कोहलीने आतापर्यंत केवळ 204 डाव खेळलेले आहेत.

हिंदुस्थान-वेस्ट इंडीज दुसरी वन डे
थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्टस्’वर
दुपारी 1.30 वाजता

उभय संघ –
हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, उमेश यादव, खलील अहमद.

वेस्ट इंडीज – जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियन एलेन, सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिमोन हेटमेयर, शाई होप, अलजारी जोसेफ, किरेन पॉवेल, एशले नर्स, किमो पॉल, रोवमॅन पॉवेल, केमार रोच, मार्लोन सॅम्युएल्स, ओशॅन थॉमस, ओबेड मॅककोय.