भाजप पुन्हा सत्तेत आली तर देशाचा हिंदू पाकिस्तान होईल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोची

भाजप जर २०१९ मध्ये सत्तेत आली तर आपल्या देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी उधळली आहेत. केरळ येथ काँग्रेसच्या सभेत भाजपवर टीका करताना त्यांनी हे बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शशी थरूर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.

‘जर २०१९ मध्ये भाजप लोकसभा निवडणूक जिंकली तर ते देशाचे संविधानच बदलून टाकतील. आपल्या संविधानातील एक एक कायदे धाब्यावर बसवून ते देशासाठी नवीन संविधान तयार करतील. हे नवीन संविधान हिंदू राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीने तयार केलेलं असेल. त्यानंतर अल्पसंख्याकांना समानतेने वागणूक मिळणार नाही, त्यांचे सर्व हक्क काढून घेतले जातील. त्यानंतर हा देश हिंदू पाकिस्तान होऊन जाईल. अशा देशासाठी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलंय’, अशा शब्दात थरूर यांनी भाजपवर टीक केली आहे.

थरूर यांच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे देशातील हिंदूंचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला असून याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ‘काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी देशाचे दोन तुकडे करून पाकिस्तानची निर्मिती केली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसने हिंदुस्थानचा व हिंदूचा अपमान केला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना सांगितले.