
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी पाचव्या दिवशी लॉन बॉलसारख्या काहीशा अपरिचित खेळात हिंदुस्थानी महिलांनी सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. स्पर्धेतील 92 वर्षांच्या इतिहासात हिंदुस्थानचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक होय. सुवर्णपदकाच्या लढतीत हिंदुस्थानने दक्षिण अफ्रिकेवर 17-10 अशा गुणफरकाने बाजी मारली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे चौथे सुवर्णपदक ठरले.
हिंदुस्थानी संघातील लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी टिर्की या चौकडीने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. प्रथम दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. त्यानंतर हिंदुस्थानी महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवीत 4-2 अशी आघडी घेतली. सहाव्या फेरीनंतर हिंदुस्थानने आपली आघाडी 7-2 अशी भक्कम केली. सातव्या फेरीनंतर ही आघाडी 8-2 अशी झाली. हिंदुस्थानची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जबरदस्त पुनरागमन करीत 8-8 अशी बरोबरी साधत लढतीत रंगत निर्माण केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 10-8 अशी आघाडीही घेतली. 10व्या फेरीपर्यंत उभय संघांची 10-10 गुणांसह पुन्हा बरोबरी झाली. 13व्या फेरीत हिंदुस्थानने 12-10 अशी आघाडी मिळविली.
पहिल्या स्पर्धेपासून लॉन बॉलचा समावेश
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 1930 पासून खेळली जाते. लॉन बॉल हा क्रीडा प्रकारही पहिल्या स्पर्धेपासूनच राष्ट्रकुलचा भाग आहे. मात्र, नवी दिल्ली येथे 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी पुरुष आणि महिला संघ प्रथमच लॉन बॉल क्रीडा प्रकारात पात्र ठरले होते. हिंदुस्थानात हा खेळ फारसा लोकप्रिय नसल्याने या खेळाबद्दलची माहितीदेखील काही मोजक्याच लोकांना आहे.





























































