
सामना ऑनलाईन । बंगळूरू
अनधिकृत कसोटी सामना जिंकल्यानंतर यजमान हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाने शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या चारदिवसीय कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजवला. हनुमा विहारीच्या नाबाद १३८ धावा पहिल्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरल्या. हिंदुस्थान ‘अ’ संघाने पहिल्या दिवसअखेरीस ४ बाद ३२२ धावा तडकावल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पृथ्वी शॉ व मयांक अग्रवाल या सलामीवीरांना आपली चमक दाखवता आली नाही. डय़ुएन ओलिवरने मयांक अग्रवालला शून्यावरच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच ऍनरीच नॉर्तझेने पृथ्वी शॉला १६ धावांवर बाद केले. त्यामुळे हिंदुस्थान ‘अ’ संघाची अवस्था २ बाद १८ अशी बिकट झाली. हनुमा विहारी व कर्णधार श्रेयस अय्यर या जोडीने हिंदुस्थान ‘अ’ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण सेनुरन मुथूसामी या फिरकी गोलंदाजाने श्रेयस अय्यरला ३९ धावांवर बाद करीत तिसरा धक्का दिला.
१७७ धावांची दमदार भागीदारी
हनुमा विहारी व अंकित बावणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची दमदार भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोघांनी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. महाराष्ट्राच्या अंकित बावणे याने १४६ चेंडूंत १ षटकार व १० चौकारांसह ८० धावांची सणसणीत खेळी साकारली. ऑफस्पिनर डेन पिडट् याने अंकित बावणेला बाद केले. आता हनुमा विहारी १३ चौकारांची बरसात करीत १३८ धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत श्रीकार भारत ३० धावांवर खेळत आहे.





























































