
जगातली चौथी सगळ्यात शक्तिशाली वायूसेना असलेली हिंदुस्थानी वायुसेना आता अधिक बलशाली झाली आहे. शत्रुला हवेतच यमसदनी धाडणारं जगातलं सर्वात ताकदवान हेलिकॉप्टर अपाचे मंगळवारी वायुसेनेत दाखल झालं आहे. एएच-64ई अपाचे हेलिकॉप्टरला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धानोआ यांच्या उपस्थितीत पठाणकोट एअरबेसवर हवाई दलात समाविष्ट करण्यात आलं.
हिंदुस्थानने बोईंग कंपनीला अशा प्रकारच्या 22 हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली आहे. त्या ऑर्डरप्रमाणे पहिल्या टप्प्यात काही हेलिकॉप्टर्स हवाई दलात सामील झाली आहेत. पुढील वर्षापर्यंत 22 हेलिकॉप्टर्स तीन टप्प्यांत सामील केली जाणार आहेत. उडता रणगाडा अशा टोपणनावाने प्रसिद्ध असलेलं हे हेलिकॉप्टर हे युद्धभूमीतल्या एखाद्या महारथी योद्ध्यापेक्षा कमी नाही. 20 हजार फूट उंचावरून उडू शकणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये बसवलेल्या क्षेपणास्त्रांमुळे एकाच वेळी 256 अस्थिर लक्ष्यांचा वेध घेण्याची क्षमता आहे. अत्यंत आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेमुळे अपाचे जगातील सर्वात आधुनिक युद्धासाठीचे हेलिकॉप्टर मानलं जातं. रात्रीच्या गडद अंधारातही शत्रुला यमसदनी धाडण्यासाठी अपाचे सक्षम आहे. हिंदुस्थान अपाचे वापरणारा जगातला 14वा देश आहे.
























































