
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या डीफेन्स काऊन्सिलने लष्करासाठी अत्याधुनिक शस्त्रसामग्री खरेदी करता यावी म्हणून तब्बल 46 हजार कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. या निधीतून नौदल, सैन्यदलासाठी अत्याधुनिक शस्त्रसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानची तटवर्तीय सुरक्षा तसेच सीमासुरक्षा आणखी कडेकोट होणार आहे. नौदलासाठी हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याला स्ट्रटेजिक पार्टनरशिप (एसपी मॉडेल) अर्थात धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. हिंदुस्थानातील खासगी शस्त्रात्र बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून हिंदुस्थानातील शस्त्रात्र कंपन्या जगातील मोठय़ा कंपन्यांबरोबर काम करणार आहेत.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा पहिल्यांदाच एकत्रित युद्धसराव
हिंदुस्थान आणि पाकिस्तान पहील्यांदाच एका युद्धसरावात एकत्र सहभागी होत आहेत. हा युद्धसराव रशियात शांघाय सहकार्य संघटनेच्या माध्यमातून 24 ऑगस्टपासूनच सुरू झाला आहे. हा युद्धसराव 29 ऑगस्टपर्यंत चालणार असून यात रशिया, चीन, उज्बेकिस्तान, तजाकिस्तान, किर्गीस्तान आणि कजाकिस्तान हे देशही सहभागी होणार आहेत. हिंदुस्थान आणि पाकिस्तान गेल्या वर्षी जूनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेचा पूर्णवेळ सदस्य बनले आहेत.
म्हणून हिंदुस्थान युद्धसरावात
आठ सदस्य असलेली एससीओ संघटना जगभरातील 40 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. जागतिक विकास दरात या संघटनेचा 20 टक्के सहभाग आहे. दहशतवादाशी लढण्याच्या मोहिमेत ही संघटना सर्वात महत्वाची भूमिका निभावू शकते. हे लक्षात घेऊन हिंदुस्थानने युद्धसरावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चीन हिंदुस्थानशीही संयुक्त युद्धसराव करत असून सप्टेंबरमध्ये या दोन देशांमध्ये पुन्हा युद्धसराव सुरू होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी डोकलाम वादामुळे युद्धसराव होऊ शकला नव्हता.
कुठली शस्त्रसामग्री खरेदी करणार
नौदलासाठी 21 हजार कोटी रुपये खर्चून 111 अत्याधुनिक हॅलिकॉप्टर्स खरेदी करण्यात येणार आहेत. ही हॅलीकॉप्टर्स दोन इंजिनाची असतील. सिंगल इंजीन असलेल्या चेतक हॅलिकॉप्टर्सची जागा हे हॅलिकॉप्टर्स घेतील. युद्धनौकेवरूनही ही हॅलिकॉप्टर्स उड्डाण घेऊ शकतील. याशिवाय 3,364 कोटी रुपये खर्चून सैन्यदलासाठी 150 स्वदेशी बनावटीच्या तोफा आणि जवळपास 22 हजार कोटी रुपये इतर साधनसामग्री खरेदी करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.
युद्धसरावाचा नेमका हेतू काय
शांघाय सहकार्य संघटनेत सहभागी देशांना दहशतवादाशी लढण्याचे प्रशिक्षण देणे हा या युद्धसरावाचा मुख्य हेतू असल्याचे हिंदुस्थानच्या सैन्यदलाचे प्रवक्ता कर्नल अमन आनंद यांनी सांगितले.
हिंदुस्थानचे 200 जवान, अधिकारी सहभागी
चीनमध्ये एप्रिलमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटेच्या बैठकीदरम्यान संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी या युध्दसरावात सहभाग घेण्याबाबत सांगितले होते. शांती मिशन 2018 अंतर्गत हा युद्धसराव करण्यात येणार असून त्यासाठी हिंदुस्थानने 200 जवान आणि अधिकारी पाठवले आहेत. यात 167 आर्मी आणि 33 हवाई दलाचे अधिकारी सहभागी आहेत.
8 देशांचे 3 हजार सैनिक
देश -सैनिक
रशिया -1700
चीन -148
हिंदुस्थान – 200
पाकिस्तान – 110
इतर देश – 242
एकूण – 3000
























































