
कोटय़वधी रुपयांच्या रिअल इस्टेट घोटाळा प्रकरणी अमेरिकेतील टेक्सास येथे एका हिंदुस्थानी दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. बोगस गुंतवणूक स्कीमच्या माध्यमातून या दोघांनी 100हून अधिक लोकांना 3 कोटी रुपयांचा चुना लावला आहे.
सिद्धार्थ मुखर्जी व सुनीता मुखर्जी अशी या पती-पत्नीची नावे आहेत. हे दाम्पत्य सध्या यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्पर्ह्समेंट (ICE) च्या ताब्यात आहे. मुखर्जी दाम्पत्याने उच्च परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना अस्तित्वातच नसलेल्या रिअल इस्टेट पंपनीत गुंतवणूक करायला भाग पाडले. या व्यवहाराच्या बदल्यात गुंतवणूकदारांना बनावट कागदपत्रे देण्यात आली. लाभांशाचे चेक बाउन्स झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीनंतर मागील वर्षी पहिल्यांदा हा घोटाळा उघडकीस आला. सुरुवातीला पोलिसांनी व नंतर एफबीआयने याची चौकशी केल्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती लक्षात आली.
असे घोटाळेबाज पाहिले नाहीत!
मुखर्जी दाम्पत्याने हा घोटाळा इतका बेमालूमपणे आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करून केला की चौकशी करणारे अधिकारीही चक्रावून गेले. माझ्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सॅमी मुखर्जीसारखा फसवणूक करणारा कधीच पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱयाने दिली. आतापर्यंत 20 पीडित पुढे आले आहेत. फसवणूक झालेल्यांचा आकडा 100पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.