अस्थिर बांगलादेशात हिंदुस्थानचा दौरा, बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेचे ढग गडद झाले असतानाही हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा दौरा मात्र ठरल्याप्रमाणे होणार आहे. आंदोलने, तणावपूर्ण वातावरण आणि सुरक्षेबाबतच्या सततच्या इशार्यांमुळे हा दौरा आधी पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेपेक्षा ‘पॅलेंडर’ आणि व्यावसायिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मालिकेची तारीख जाहीर केली असली, तरी देशातील राजकीय परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचा ठोस दावा समोर आलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कोणत्या आधारावर दौर्याला हिरवा पंदील दाखवला, हा सवाल उपस्थित होत आहे. हिंदुस्थानी संघ 28 ऑगस्टला ढाक्यात दाखल होणार असून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवडयात सामने खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी खेळवले जातील. त्यानंतर टी-20 सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होतील. ही मालिका संपल्यानंतर हिंदुस्थानी संघ मायदेशी परतेल, अशी माहिती ‘बीसीबी’चे क्रिकेट ऑपरेशन्स प्रभारी शहरियार नफीस यांनी दिली.

खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि हिंदुस्थानी चाहत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार, याचे स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही. आयसीसी आणि बीसीसीआयकडून ‘परिस्थितीवर लक्ष आहे’ एवढेच औपचारिक विधान ऐकायला मिळते. मात्र प्रत्यक्ष मैदानाबाहेर घडणार्या घडामोडी चिंता वाढवणार्या आहेत. क्रिकेटचे वेळापत्रक महत्त्वाचेच, पण खेळाडूंचे जीव त्याहून मौल्यवान आहेत. राजकीय अस्थिरतेच्या आगीत क्रिकेट खेळवण्याचा हा निर्णय भविष्यात बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरेल का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.