… तर स्वखर्चाने हिंदुस्थानी संघ आशियाई स्पर्धेसाठी पाठवू – एआयएफएफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,नवी दिल्ली

हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) आडमुठे धोरण दाखवत इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी फुटबॉल संघाला सहभागाची मंजुरी दिलेली नाही. जर संघाचा प्रवास आणि निवासखर्च हाच मुद्दा असेल तर आम्ही आमच्या खर्चाने हिंदुस्थानी संघाला आशियाई स्पर्धेला पाठवू असा निर्धार अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) व्यक्त केला आहे.

एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी आयओए च्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,देशातील शिखर क्रीडा संघटनेने फुटबॉलसारख्या खेळाकडे पाठ फिरवणे योग्य नाही. आमच्याशी कुठलीही चर्चा न करता आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानी फुटबॉल संघाला मंजुरी न देण्याचे धोरण आम्हाला पटलेले नाहीय. फुटबॉल महासंघाची नाराजी मी आयओएला पत्राने कळवली आहे. मंजुरीसाठी जर खर्चाचाच मुद्दा असेल तर महासंघ स्वतःच्या खर्चाने संघ इंडोनेशियाला पाठवायला तयार आहे .पण कोणत्याही परिस्थितीत प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. वेळ पडल्यास केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाचे दरवाजे आम्ही ठोठावण्याची तयारीही ठेवली आहे. क्रीडा मंत्रालय आणि साईने सतत हिंदुस्थानी फुटबॉल संघाच्या सुधारत्या कामगिरीचे कौतुकच केले आहे. आम्हाला विश्वास आहे की, ते आमच्या पाठीशी उभे राहतीलच.

हिंदुस्थानी संघ चमकदार कामगिरी करतोय
गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानी फुटबॉल संघाने चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच फिफा मानांकनात हिंदुस्थानी संघाने १७३ वरून थेट ७३व्या मानांकनावर झेप घेतली आहे. शिवाय एएफसी आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठीही संघ पात्र ठरला आहे. या प्रगतीची दाखल घेण्याचे साधे सौजन्यही हिंदुस्थानी ऑलिम्पिक महासंघाने दाखवले नाही याचेच वाईट वाटते असेही कुशल दास यांनी सांगितले. .