
हिंदुस्थानी नौदलाच्या मदतीने श्रीलंकेजवळ एमटी न्यू डायमंड या तेलाच्या टँकरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आयएनएस सह्याद्रीचे कमांडर आग लागण्याच्या कारणांचा शोध घेत आहेत. हा टँकर श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यापासून 70 किलोमीटरवर आहे. इमरजेन्सी टोइंग वेसल ओशन ब्लिससह इतर साधनांचा वापर करून जहाजाला हटवण्यात येणार आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असून परिस्थितीची माहिती घेण्यासाठी हवाई पाहणी करण्यात येत असल्याचे आयएनएस सह्याद्रीच्या कमांडर यांनी सांगितले.
आग पूर्णपणे विझवण्यासाठी हवेतून रासायनिक पावडरची फवारणी करण्यात येत आहे. कुवैतहून 270,000 मेट्रिक टन कच्चे तेल हिंदुस्थानात आणणाऱ्या जहाजाला गुरुवारी आग लागली होती. टँकरमध्ये असलेल्या 23 क्रू सदस्यांपैकी 22 जणांना वाचवण्यात यश आले. तर इंजिनरुम बाहेर झालेल्या बॉयलरच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. श्रीलंकेचे नौदल, वायुसेना यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश येत नसल्याने हिंदुस्थानकडे मदत मागण्यात आली. हिंदुस्थानने जहाज शौर्य, सांरगसह डोर्निअर विमानांना आग विझवण्यासाठी पाठवले. तसेच आयएनएस सह्याद्रीलाही आग विझवण्याच्या मोहिमेसाठी पाठवण्यात आले.
हिंदुस्थानी नौदलाने श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत मोहिमेला सुरुवात केली. जहाज शौर्यकडून टँकरवर पाण्याची फवारणी करण्यात आली. हवाई दलाकडून बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यात येत होती. जहाजातून तेलगळती होण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवल्यानंतर शुक्रवारी मोहिमेला गती देण्यात आली. त्यानंतर आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.
indian-navy-ins-sahyadri-monitor-fire-on-oil-tanker



























































