रेल्वे प्रवासात ऐका आवडीची गाणी; चित्रपटही पाहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांब पल्ल्यांचा रेल्वे प्रवास आता आरामाबरोबरच मनोरंजन करणारा ठरणार आहे. रेल्वे प्रवाशांना आवडीची गाणी ऐकण्याची तसेच चित्रपट पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा विचार असून येत्या एप्रिल महिन्यापासून राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या गाडय़ांमध्ये ‘ऑन डिमांड कंटेंट’ची सुविधा मोफत मिळणार आहे.

रेल्वे बोर्डाचे संचालक वी.के.यादव यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले, ‘लवकरच ही सुविधा पुरविण्यासाठी कंपनीची निवड केली जाणार आहे. ही कंपनी रेल्वे गाडय़ांमध्ये हॉट स्पॉटची सुविधा उपलब्ध करून देईल. प्रवाशांना आपला मोबाईल, लॅपटॉप अथवा आयपॅड हॉटस्पॉटशी कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर प्रवाशांना एक ऍप डाऊनलोड करावे लागेल. याद्वारे प्रवासी आपल्या आवडीची गाणी किंवा चित्रपटाची निवड करेल’.

राजधानी, दुरांतो, शताब्दी, वंदे भारत या ट्रेनमध्ये ‘ऑन डिमांड कंटेंट’ ही सुविधा मिळणार आहे.

  • लांब पल्ल्यांच्या अन्य गाडय़ांमध्येही ही सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे. कमी अंतराच्या आणि पॅसेंजर गाडय़ांमध्ये मात्र ही सुविधा मिळणार नाही.
  • कंटेंटमध्ये काही भाग सरकारी योजनांच्या जाहिराती असतील तसेच कंपनीचीदेखील जाहिरात असेल. कंपनी जाहिरातीच्या बदल्यात रेल्वेला मोबदला देणार आहे.

धुक्यामुळे लेटलतिफ ट्रेनची समस्या आता दूर होणार

धुक्यामुळे ट्रेनना उशीर होण्याची समस्या लवकरच दूर होणार आहे. रेल्वेकडून ‘फॉग विजन डिव्हाईस’ची चाचणी सुरू असून ही चाचणी यशस्वी झाल्यास 20 जानेवारीनंतर 25 रेल्वे गाडय़ांच्या इंजिनमध्ये हे डिव्हाईस बसविण्यात येणार आहे. सर्वात आधी दिल्लीतून सुटणाऱया शताब्दी गाडीमध्ये ते बसविण्यात येणार आहे. या डिव्हाईसच्या माध्यमातून दूर अंतरावरील दृश्यदेखील स्पष्ट दिसणार आहे. तसेच रेल्वेच्या मार्गावर येणाऱया अडथळ्यांची ईमेजही डिव्हाईसमधील कॅमेऱयाच्या माध्यमातून लोको पायलटला दिसणार आहे.