आई शपथ… 47 भाषा बोलणारा रोबो, मुंबईतील केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकाची कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध भाषा लक्षात ठेवताना अनेकांची बोबडी वळते. पण मुंबईतील एका शिक्षकाने एक-दोन नव्हे तर तब्बल 47 भाषा बोलणाऱया रोबोची निर्मिती करीत उभ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘शालू’ हा रोबो हिंदुस्थानातील 9 आणि विदेशातील 38 भाषा बोलू शकतो. दिनेश पटेल या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी रोबोची निर्मिती केली आहे.

आयआयटी मुंबई येथील केंद्रीय विद्यालयात शिकविणाऱया दिनेश पटेल यांनी तीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर ‘शालू’ हा रोबो तयार केला आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी, भोजपुरी, जर्मन, फ्रेंचसह इतर भाषा हा रोबो सहज बोलू शकतो. ‘शालू’ रोबोट हा प्लॅस्टिक, पुठ्ठा, लाकूड, ऍल्युमिनियम इत्यादी टाकाऊ सामानाचा वापर करून तयार केला. त्यासाठी 50 हजार रुपये खर्च आला आहे.

याबद्दल दिनेश पटेल म्हणाले, शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या रोबोची निर्मिती केली आहे. सध्या हा रोबो प्रोटोटाइम स्वरूपाचा असून लवकरच त्याचा व्हर्जन-2 येणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी ‘शालू’ रोबो एक आदर्श साथीदार असेल.

हात-मान हलवणे, हसणे आणि रागाच्या भावना प्रदर्शित करणे इत्यादी क्रिया हा ‘शालू’ रोबो करू शकणार आहे.
व्यक्ती ओळखणे, गोष्टी लक्षात ठेवणे, सामान्य ज्ञान, गणितासंबंधित ज्ञान ही या रोबोची वैशिष्टय़े आहेत.
हा रोबो लोकांना अभिवादन करू शकणार असून वर्तमानपत्र वाचण्याबरोबरच जेवणाच्या विविध डिशची माहितीही ठेवू शकतो.
सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून या रोबोची निर्मिती करण्यात आली असली तरी लवकरच मास्कच्या वापरातून हा रोबो अधिक सुंदर बनविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
आयआयटी मुंबईनेदेखील या रोबोच्या निर्मितीचे कौतुक केले असून नव्या संशोधकांसाठी हे नक्कीच प्रेरणादायी असल्याचे मत आयआयटीच्या शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.