
चीनसह जगभरात हाहाकार माजविणाऱया ‘कोरोना’ व्हायरसवर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्र्ाज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. ऑस्ट्रेलियातील अनिवासी हिंदुस्थानी प्राध्यापक एस. एस. वासन यांनी आपण लस शोधण्याच्या अगदी जवळ गेल्याचा दावा केला आहे. वासन यांना लवकरात लवकर यश मिळाले तर ‘कोरोना’मुळे बाधित झालेल्या चीनमधील हजारो रुग्णांना जीवदान मिळणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 700 जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. जगभरात अनेक देशांमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण आढळले आहेत. हिंदुस्थानसह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना चीनमधून मायदेशी आणले आहे. उद्योग विश्व, अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर वासन यांनी लस शोधण्याच्या अगदी जवळ असल्याची माहिती दिल्यामुळे जगाला दिलासा मिळाला आहे.
डेंग्यू, चिकनगुनियावर मोठे काम
एस. एस. वासन यांनी बिट्स पिलानी येथून पदवी घेतली आहे. त्यानंतर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्येही शिक्षण घेतले. स्कॉलरशिपनंतर वासन यांनी ऑस्ट्रेलियातील ट्रिनिटी इन्स्टिटय़ूटमध्ये डॉक्टरेट मिळविली. ऑस्ट्रेलियातच ते स्थायिक झाले असून डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका व्हायरसवरही त्यांनी यापूर्वी काम केले आहे.
कुठे सुरू आहे संशोधन?
– ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (सीएसआयआरओ) एका हायसिक्युरिटी प्रयोगशाळेत लस तयार करण्याचे काम सुरू आहे.
– ‘सीएसआयआरओ’च्या पॅथोजन्स टीमचे प्रमुख एस. एस. वासन आहेत.
– कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका रुग्णाचा विषाणूचा नमुना घेण्यात आला. त्या नमुन्यापासून कोरोनाचा विषाणू आयसोलेट करण्यात यश आले. यासाठी मी ऑस्ट्रेलियातील डॉर्टी इन्स्टिटय़ूटच्या सहकाऱयाचा आभारी आहे असे प्राध्यापक एस. एस. वासन यांनी सांगितले.
– विषाणू खरा असेल तर काम लवकर होते. प्री क्लिनिकल अभ्यासासाठी लस शोधन औषध तयार करण्यात येते. कोरोनावरील लस शोधण्याचा आम्ही अगदी जवळ पोहचलो आहोत असे वासन म्हणाले.




























































