मालदीवच्या माजी मंत्र्याने केला राष्ट्राध्यक्ष मुइज्जूचा यांच्या खोटारडेपणाचा भांडाफोड, काय म्हणाले?

चीन समर्थक समजले जाणारे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या खोटारडेपणाचा त्यांच्याच मंत्र्याने भांडाफोड केला आहे.  हजारो हिंदुस्थानी सैनीकांच्या उपस्थितीचा दावा खोटा आहे. देशात एकही सशस्त्र सैनिक उपस्थित नसल्याचे मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री यांनी सांगितले.

मालदीवचे माजी मंत्री अब्दुल्ला शाहिद म्हणाले, 100 दिवस झाले आहेत, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, राष्ट्रपती मुइज्जू यांचे हजारो हिंदुस्थानी सैनीक दावे फक्त खोटे आहेत. प्रशासन एक आकडा मांडू शकलेले नाही. देशात कुठेही सशस्त्र सैनिक नाही. ते पुढे म्हणाले, पारदर्शकता गरजेची आहे आणि सत्याचा विजय व्हायला हवा. विशेष म्हणजे मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मुइझू सतत हिंदुस्थानविरोधी गरळ ओकत असतात. हा प्रकार त्यांच्या निवडणूक प्रचारापासून सुरू आहे, जिथे त्यांनी विशेषतः मालदीवमधून हिंदुस्थानी सैन्याला बाहेर काढण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्ता हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, मुइझू यांनी औपचारिकपणे हिंदुस्थान सरकारला सैन्य मागे घेण्यास सांगितले.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही मुइझूने दावा केला होता की हिंदुस्थान सरकारशी चर्चेनंतर करार झाला होता. हिदुस्थान सरकारने सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावा त्यांनी केला. आकडेवारीनुसार सध्या 70 हिंदुस्थानी सैनीक मालदीवमध्ये आहेत. याशिवाय डॉर्नियर 228 गस्ती विमान आणि 2 HAL हेलिकॉप्टर मालदीवमध्ये आहेत.