सूज्ञपणा दाखवल्यास टीम इंडिया यंदाचा टी-20 विश्वचषक जिंकू शकेल! सौरभ गांगुलींचा विश्वास

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास आपले क्रिकेटपटू सज्ज आहेत. मात्र हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी यंदाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रगल्भता (मॅच्युरिटी) दाखवली तर हिंदुस्थानी संघ नक्कीच ही स्पर्धा जिंकू शकेल असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी हिंदुस्थानी कर्णधार सौरभ गांगुली यांनी संघाला शुभेच्छा देताना व्यक्त केला आहे.

यंदाची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रविवारपासून सुरू होत असली तरी हिंदुस्थानला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सलामीला 24 ऑक्टोबरला झुंजायचे आहे. हा बहुचर्चित हायव्होल्टेज सामना जिंकून टीम इंडिया विजयी ‘बोहनी’ करेल यात शंकाच नाही असे सांगून बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाले, विराटच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघातील खेळाडूंत गुणवत्तेचा अभाव मुळीच नाहीय. पण त्यांना प्रत्येक लढत आपली प्रगल्भता दाखवून खेळावी लागणार आहे. कारण विश्वचषकाच्या लढतीतील दबाव हा अन्य लढतींपेक्षा मोठा असतो याचे भान आपल्या क्रिकेटपटूंना ठेवावेच लागेल.

लढत जिंकण्यावर भर द्या

विजेतेपदाचा निर्णय अंतिम लढतीनंतरच लागतो. म्हणूनच टीम इंडियाच्या खेळाडूंनी थेट जेतेपदाची विचार करण्यापेक्षा प्रत्येक लढत कशी जिंकता येईल याकडे लक्ष्य पेंद्रित करावे असा मोलाचा सल्ला बीसीसीआयचे प्रमुख गांगुली यांनी दिला. खेळाडूंनी आपल्या टॅलंटचे पुरेपूर प्रदर्शन सर्व लढतींत करण्याचा प्रयत्न करावा, असेही गांगुली यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना बजावले.

मैदानाचे स्वरूप पाहून खेळा !

टी-20 विश्वचषकातील लढती दुबई, शारजा आणि अबुधाबी अशा तीन ठिकाणांवर खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या खेळपट्टय़ांचे स्वरूप वेगळे आहे. प्र्रत्येक ठिकाणच्या खेळपट्टय़ांचे स्वरूप अभ्यासून टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी योग्य रणनीती ठरवून आपला खेळ करावा असा सल्लाही गांगुली यांनी दिला.