अमेरिकेत हिंदुस्थानी तरुणीची हत्या करून प्रियकर फरार, आरोपीविरुद्ध अटक वॉरंट जारी

अमेरिकेतील मॅरीलँड राज्यामध्ये एका 26 वर्षीय तरुणाने आपल्या 27 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन शर्मा असे या संशयित आरोपीचे नाव असून, निकिता गोडीशाला असे मृत तरुणीचे नाव आहे. निकिता ही एलिकॉट सिटीची रहिवासी होती. विशेष म्हणजे, निकिता बेपत्ता असल्याची तक्रार अर्जुनने स्वतः 2 जानेवारी रोजी पोलिसात नोंदवली होती, मात्र त्यानंतर तो तातडीने हिंदुस्थानात पळून गेल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनने पोलिसांना सांगितले होते की निकिता 31 डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता आहे. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना अर्जुनच्या वर्तणुकीवर संशय आला आणि त्यांनी 3 जानेवारी रोजी कोलंबिया येथील त्याच्या फ्लॅटची झडती घेतली. यावेळी निकिताचा मृतदेह त्याच फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला. तिच्या शरीरावर वार केल्याच्या अनेक खुणा होत्या. पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार सांगितले आहे की, 31 डिसेंबरच्या संध्याकाळीच तिची हत्या करण्यात आली असावी.

पोलिसांना अर्जूनवर संशय येताच अर्जून घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर अमेरिकन पोलिसांनी अर्जुन शर्माविरुद्ध अटक वॉरंट जारी केले असून त्याचा शोध घेण्यासाठी अमेरिकन फेडरल एजन्सी आणि हिंदुस्तानी यंत्रणांशी संपर्क साधला जात आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.