हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश ऑलिम्पिकसाठी सज्ज होतेय

टोकियो ऑलिम्पिक तोंडावर आल्याने हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू विनेश पह्गाटने आता सरावावर लक्ष पेंद्रित केले आहे. मात्र, कोरोनावर मात केल्यानंतर विनेश आता कमालीची सावध झाली असून, पुन्हा या महामारीचा संसर्ग होऊ नये म्हणून ती सध्या आपली बहीण प्रियंका हिच्यासोबतच सराव करत आहे.

विनेश म्हणाली, टोकियो ऑलिम्पिक जवळ आल्याने पुन्हा कोरोना झाल्यास परवडणारे ठरणार नाही. त्यामुळे हॉलमध्ये कोणी नसताना मी माझी बहीण प्रियंकासोबतच कुस्तीचा सराव करते. जिममध्येही मी एकटीच सराव करते. कोरोनाची दुसरी लाट वाढल्याने मायदेशात असाच सावध सराव करावा लागतो. परदेशात सराव करताना कोरोनाची फारशी भीती नसते. कारण सरावासाठी येणाऱया प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी झालेली असते. देशातील प्रतिकूल वातावरणामुळे सध्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत अडचणी येत आहेत, असेही विनेशने सांगितले.

ब्लड प्रेशरचा त्रास

विनेश म्हणाली, मागील दोन स्पर्धांसाठी वजन कमी केल्यामुळे माझा ब्लड प्रेशर कमी होत आहे. मात्र, हा त्रास 2019मध्येही झाला होता. कुस्तीच्या दरम्यानही मला असा त्रास झालेला आहे. मात्र, टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत मी कुठलीही कसर सोडणार नाही, असेही तिने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या