टीम इंडियाची मंगळवारी लीड्सवर अग्निपरीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लीड्स

इंग्लंडला टी- २० मालिकेत २-१ असे पराभूत करणाऱ्या टीम इंडियाला मंगळवारी लीड्सच्या हेडींग्ले मैदानावर मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यजमान इंग्लंडने लॉर्डसचा दुसरा सामना जिंकून वनडेतील आपले टॉपचे मानांकन कायम राखले आहे. आता दुसऱ्या मानांकित हिंदुस्थानला सलग १० वा मालिका विजय साकारण्यासाठी इंलंडविरुद्ध कामगिरी उंचावावी लागणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना वनडे मालिका विजयासाठी लॉर्ड्सवर केलेल्या चुका टाळाव्या लागणार आहेत. गोलंदाजांचे अपयश आणि मोठ्या टार्गेटपुढे फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे हिंदुस्थानला दुसरा सामना गमवावा लागला होता. येती विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आल्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजय टीम इंडियासाठी टॉनिकच ठरणार आहे.

हिंदुस्थानी संघाचे वेगवान आणि फिरकी गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घालण्यात लॉर्ड्सवर पार अपयशी ठरले होते .त्यामुळेच इंग्लंडला ५० षटकांत ३२३ धावांचा मोठा पल्ला गाठता आला होता. त्यानंतर हिंदुस्थानी फलंदाज मोठी कामगिरी साकारू न शकल्याने टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत ८६ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यातच डेथ ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना वेसण घालू शकणारे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांची अनुपस्थिती हिंदुस्थानला  जाणवली.

हिंदुस्थान विजयी मालिका राखण्यास उत्सुक

जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका १-४ अशी गमावल्यानंतर टीम इंडियाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. झिम्बाबवे ,न्यूझीलंड (दोनदा ),इंग्लंड ,वेस्ट इंडिज,श्रीलंका (दोनदा ),ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघाना मायदेशी आणि विदेशात पराभूत करण्याचा पराक्रम हिंदुस्थानी संघाने केला आहे. हीच टीम इंडियाची मोठी जमेची बाजू आहे. मात्र इंग्लंडची पांढऱ्या चेंडूच्या वनडेतील कामगिरीही चमकदार आहे .हिंदुस्थानने मायदेशातील वनडे मालिकेत इंग्लंडला अटीतटीच्या झुंजीत २-१ असे  पराभूत केले होते

मधल्या फळीतील फलंदाजाचे अपयश

लॉर्ड्सच्या वनडेमध्ये हिंदुस्थानची फलंदाजांची मधली फळी पार अपयशी ठरली. विराट कोहली .रोहित शर्मा .शिखर धवन आणि लोकेश राहुल या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आल्यास मधली फळीही पार खिळखिळी होते अशी सध्या टीम इंडियाची स्थिती आहे .यावर तोडगा न निघाल्यास यजमान इंग्लंड विराट सेनेला भारी पडू शकतो.त्यामुळे सुरेश रैना , महेंद्रसिंग धोनी यांच्यासह तळातील हार्दिक पांड्या ,कुलदीप यादव यांनीही बॅटचा करिष्मा दाखवला तरच हिंदुस्थानला विजय मिळवता येणार आहे.

यातून निवडले जातील प्रतिस्पर्धी संघ

हिंदुस्थान- विराट कोहली (कर्णधार) ,शिखर धवन ,रोहित शर्मा ,लोकेश राहुल, सुरेश रैना ,महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या ,कुलदीप यादव , युझवेन्द्र चहल , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल ,सिद्धार्थ कौल,उमेश यादव, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार .

इंग्लंड – इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो , जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली,
जो रूट, जेक बॉल, लियम प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल रशीद,डेविड व्हिली, मार्क वूड, जेम्स व्हिन्स.